भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना फजलूर रहमान यांनी थेट पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना सवाल करत देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भारताने मुरीदके येथे कारवाई केली, तर त्यात चूक काय, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


२१ डिसेंबर २०२५ रोजी कराची येथे झालेल्या ‘तहफ्फुज दीनिया मदारीस कॉन्फरन्स’मध्ये मौलाना फजलूर रहमान मुख्य वक्ते म्हणून सहभागी झाले होते. या सभेत त्यांनी लष्कराच्या धोरणांवर, अफगाणिस्तानविषयक भूमिकेवर आणि पाकिस्तानातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र शब्दांत टीका केली.


पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंध बिघडण्यास थेट लष्कर जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, लष्करी धोरणांमुळेच हे संबंध आज गर्तेत गेले आहेत. तसेच, मतदानातील गैरव्यवहारातून सत्तेत आलेल्या सरकारला हटवून देशात नव्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.


अफगाणिस्तान धोरणावर भाष्य करताना फजलूर रहमान म्हणाले की, पाकिस्तानला नेहमीच प्रो-पाकिस्तान अफगाणिस्तान हवा आहे. मात्र झहीर शाहपासून अशरफ गनीपर्यंत अफगाणिस्तानमधील सरकारे भारताभिमुख राहिली असून, पाकिस्तानच्या अपेक्षांना कधीच पूरक ठरलेली नाहीत. ही बाब सातत्याने दुर्लक्षित केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.


काबूलवरील हल्ल्यांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, काबूलवर बॉम्बहल्ले करणे म्हणजे इस्लामाबादवर बॉम्बहल्ला केल्यासारखे आहे. तालिबान काबूलवरील हल्ले शांतपणे कसे सहन करेल, असा सवाल उपस्थित करत त्यांनी लष्कराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.



भारतावर आक्षेप का, असा थेट सवाल


ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताने मुरीदके, बहावलपूरसारख्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचा संदर्भ देत मौलाना फजलूर रहमान यांनी पाकिस्तानच्या लष्कराला आरसा दाखवला. आपण शत्रूच्या तळांवर कारवाई केली, ती योग्य असल्याचे जर मान्य करत असाल, तर भारताने काश्मीरमधील तसेच मुरीदके आणि बहावलपूरमधील दहशतवादी केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांवर आक्षेप का घेतला जातो, असा सवाल त्यांनी केला.


जर भारताच्या कारवाईला विरोध केला, तर अफगाणिस्तानच्या बाबतीत पाकिस्तानवरही तेच आरोप होतील. मग अशा परिस्थितीत पाकिस्तानकडे काय उत्तर असेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अफगाणिस्तानवरील कारवाई योग्य ठरवत असाल, तर भारताची कारवाई चुकीची कशी ठरवणार, असे त्यांनी ठामपणे सांगितले.



आपले अफगाण धोरण अपयशी ठरले आहे का?


जमियत उलेमा-ए-इस्लामचे अध्यक्ष म्हणाले की, पाकिस्तानने इराणवर कारवाई केली होती. जर इराणने प्रत्युत्तर दिले असते, तर त्याचे परिणाम काय झाले असते, याचाही विचार केला पाहिजे. इराण आणि अफगाणिस्तानबाबत पाकिस्तानची भूमिका वेगळी का आहे, यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. अफगाणिस्तानमधील सत्ता कमजोर असल्यामुळेच पाकिस्तान वेगळी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


अफगाणिस्तानकडे केवळ सध्याच्या घडामोडींच्या दृष्टिकोनातून पाहू नये, असे सांगत त्यांनी पाकिस्तानच्या गेल्या ७८ वर्षांच्या अफगाण धोरणांचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली. पाकिस्तानला अफगाणिस्तानमध्ये कधीच खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्ण सरकार मिळाले नाही. ही आपल्या धोरणांचीच अपयशाची कबुली आहे का, यावर देशात चर्चा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.



पहलगाम हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर


२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले. भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील मुरीदके, बहावलपूर, मुजफ्फराबादसह नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले करण्यात आले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा करण्यात आला असून, पाकिस्तानचे अनेक हवाई तळ आणि शस्त्रसाठेही उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने

बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कहर; नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

ढाका : बांगलादेश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत सापडला असून लक्ष्मीपूर सादर उपजिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना