दिवा : दिवा येथे घराबाहेर खेळताना कुत्रा चावलेल्या पाच वर्षांच्या बालिकेची महिनाभर सुरु असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली. निशा शिंदे ( ५ वर्ष ) या बालिकेचा रविवारी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिवा पूर्वेकडील बेडेकर नगर दिवा- आगासन रॉड परिसरातील घरासमोर निशा शिंदे ही १७ नोव्हेंबर रोजी खेळत होती. खेळता खेळता कठड्यावर बसली असतानां पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्या खांद्याचा चावा घेतला.चिमुकलीला रक्तबंबाळ अवस्थेत पालकांनी तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी तिला रेबीजचे इंजेकशनही दिले. त्यामुळे तिची तब्बेत स्थिरावली होती.
३ डिसेंबर ला निशाचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तेव्हा तिची प्रकृती स्थिर होती. मात्र १६ डिसेंबर ला उपचाराचे शेवटचं इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. तिच्यात रेबीजचे लक्षण दिसू लागले. ती स्वतःच्याच शरीराचे चावे घेऊ लागल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात पाठवले.
चार दिवस निशावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, दिवसागणिक तिची प्रकती आणखीनच खालावत गेली. चिमुकलीची अशी अवस्था बघून कुटुंबियावर दु:खाचा डोंगरच कोसळला. आणि २१ डिसेंबर रोजी निशाचा करूण अंत झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचा आरोप निशाचा मामा समाधान कदम याने केला आहे.
निशा सारखी अनेक निष्पाप मुले भटक्या कुत्रांच्या चाव्यामुळे दगावली आहेत. भटक्या कुत्रांबद्दल वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे






