मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या पराभवामागची नेमकी कारणे शोधण्यासाठी बीसीसीआयकडून संपूर्ण संघाच्या कामगिरीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. २२ डिसेंबर रोजी झालेल्या बोर्डाच्या एपेक्स कौन्सिलच्या बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून तब्बल १९१ धावांनी पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ निर्णायक सामन्यात मात्र पूर्णपणे कोलमडलेला दिसला. गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे प्रभाव टाकू शकली नाही, तर फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. त्यामुळे बीसीसीआयकडून केवळ आढावा घेण्यापुरते न थांबता, टीम मॅनेजमेंटकडून पराभवाबाबत सविस्तर स्पष्टीकरण मागवले जाणार आहे.
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना एकही सामना गमावला नव्हता. मात्र, विजेतेपदाच्या सामन्यात संघाचा आत्मविश्वास ढासळलेला दिसला. निर्णायक क्षणी अनुभवी आणि आघाडीच्या खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी न केल्याने संघावर दबाव वाढत गेला.
बीसीसीआय अंडर-१९ संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांच्याशी अंतिम सामन्यातील कामगिरीवर थेट चर्चा करणार आहे. ही चर्चा टीम परफॉर्मन्स रिव्ह्यूचा महत्त्वाचा भाग असणार असून, भविष्यातील धोरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्या वर्तणुकीबाबतही बीसीसीआयने नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. या मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते आणि आवश्यक असल्यास कारवाईचाही विचार केला जाऊ शकतो. मात्र, हा मुद्दा अधिकृत रिव्ह्यू प्रक्रियेचा भाग आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
भारतीय अंडर-१९ संघाला येत्या काळात झिम्बाब्वे आणि नामीबिया येथे होणाऱ्या अंडर-१९ विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे. त्या स्पर्धेसाठी संघाची घोषणा अद्याप झालेली नसल्याने, विश्वचषकापूर्वीच आशिया कपमधील पराभवाचा आढावा पूर्ण करण्यावर बीसीसीआयचा भर आहे. भविष्यात अशा मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागू नये, यासाठी ही समीक्षा महत्त्वाची मानली जात आहे.






