Tuesday, December 23, 2025

Navnath Ban : "हिंदुत्वाचा सौदा करणाऱ्यांनी लोकशाहीवर बोलू नये"; भाजपचे नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघाती प्रहार

Navnath Ban :

मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. "ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा सौदा केला आणि मराठी माणसाची पत्राचाळ लुटली, त्यांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये," अशा शब्दांत बन यांनी राऊतांना सुनावले आहे.

भ्रष्टाचार आणि कोविड घोटाळ्यावरून टोला

नवनाथ बन यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेताना जुन्या घोटाळ्यांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, "राऊतांनी बोलायचे असेल तर पत्राचाळ लूट, खिचडी घोटाळा आणि वसुली रॅकेटवर बोलावे. कोविडच्या संकटात जेव्हा जनता होरपळत होती, तेव्हा मलिदा खाणारे आज लोकशाहीसाठी मगरीचे अश्रू ढाळत आहेत, हा दुटप्पीपणाचा कळस आहे."

घरात बसून निवडणूक, बाहेर येऊन आरोप

उद्धव ठाकरे गटावर टीका करताना बन म्हणाले की, "देशात लोकशाही पूर्णपणे सुरक्षित आहे, मात्र उभाठा गटात कार्यकर्ते बेवारस झाले आहेत. नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या तरी यांचा एकही नेता मैदानात सभा घ्यायला तयार नाही. घरात बसून निवडणुका लढवायच्या आणि निकाल प्रतिकूल लागला की यंत्रणेवर शंका घ्यायची, ही राऊतांची जुनी सवय आहे."

हिंदुत्व सोडल्याचा पश्चात्ताप आणि 'खंजीर' राजकारण

"देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून राऊतांनी जे राजकारण केले, त्याचा फटका त्यांना आता बसू लागला आहे," असा दावा बन यांनी केला. हिरव्या मतांसाठी हिंदुत्वाचा सौदा करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही आणि विधानसभेप्रमाणेच महापालिकेतही त्यांना पश्चात्ताप करावा लागेल, असेही ते म्हणाले.

विकास विरुद्ध भ्रष्टाचार : महाराष्ट्राचा कौल स्पष्ट

भाजपच्या विकासकामांचा पाढा वाचताना बन म्हणाले, "भाजप जेव्हा मेट्रो, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या विकासकामांवर बोलते, तेव्हा विरोधक केवळ घोटाळ्यांची चर्चा करतात. सव्वा दोनशे जागांचा महायुतीला मिळालेला कौल ही विकासावर उमटलेली मोहर आहे. महाराष्ट्राने भ्रष्टाचाराला पूर्णपणे नाकारले आहे."

राज ठाकरेंना धोक्याचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य जवळिकीवर भाष्य करताना नवनाथ बन यांनी इशारा दिला. ते म्हणाले, "उद्धव आणि राऊत यांची परंपरा ही नेहमीच जवळच्यांना धोका देण्याची राहिली आहे. २००८ चा इतिहास पाहता राज ठाकरेंनी सावध राहावे. ही मिठी नसून पाठीत वार करण्याची तयारी असू शकते. मनसैनिकांनी राऊतांच्या नादाला लागू नये, हे 'मनोमिलन' नसून सत्तेच्या भीतीपोटी झालेले 'मिलन' आहे."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >