Tuesday, December 23, 2025

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच

वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१ बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे अडचणीत सापडले. हे सर्व भारतीय डिसेंबर महिन्यात अमेरिकेहून व्हिसा नूतनीकरणासाठी भारतात आले होते. अमेरिकेतील सुट्ट्यांच्या काळात व्हिसा नूतनीकरणाचे काम उरकून घेऊ, या विचाराने आलेल्या भारतीयांना आता परत जाणे अवघड झाले आहे. भारतातील अमेरिकन दूतावासांनी व्हिसा मुलाखतींच्या अपॉइंटमेंट्स अचानक रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. या गोंधळाचा सर्वाधिक फटका अशा अर्जदारांना बसला आहे, ज्यांच्या मुलाखती १५ ते २६ डिसेंबरदरम्यान होत्या.

दरवर्षी एच१ बी कर्मचारी याच काळातच व्हिसा नूतनीकरणाला पसंती देतात. मात्र, अनेकांना ऐन वेळी निरोप मिळाले की, त्यांच्या अपॉइंटमेंट्स रद्द झाल्या असून, त्या आता थेट मार्च २०२६ पर्यंत पुढे ढकलल्या गेल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे व्हिसा प्रक्रियेबाबतचे बदललेले धोरण या समस्येस कारणीभूत आहे. भारतातील अमेरिकन दूतावास आणि कॉन्स्युलेट्समध्ये आधीच निश्चित झालेल्या एच१ बी आणि एच४ व्हिसा मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इमिग्रेशन वकील आणि अधिकृत माहितीनुसार, १५ डिसेंबरनंतरच्या सर्व मुलाखतींवर याचा परिणाम झाला आहे.

नवीन सुरक्षा तपासणी नियमांमुळे मुलाखतींना उशीर होत असल्याचे ईमेल अर्जदारांना कळवण्यात आले आहे. कोणताही अर्जदार अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणार नाही, याची खात्री करण्यासाठी ही कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment