ताज ग्रुपच्या आलिशान प्रकल्पाला 'ग्रीन सिग्नल'
सिंधुदुर्ग : निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता मानाचा तुरा रोवला जाणार आहे. शिरोडा-वेळाघर येथे अनेक वर्षांपासून रखडलेल्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड (ताज ग्रुप) च्या पहिल्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रकल्पातील अडथळे दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे सिंधुदुर्गात जागतिक दर्जाच्या पर्यटनाची कवाडं खुली होणार आहेत.
शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हिताला प्राधान्य
मुंबईतील 'मेघदूत' निवासस्थानी झालेल्या या बैठकीत ५२.६३ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनावर सखोल चर्चा करण्यात आली. जमिनीचा मोबदला आणि वाढीव कालावधीमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने विशेष पॅकेजला तत्त्वतः मान्यता दिली आहे. "प्रकल्पग्रस्तांना दोन टप्प्यात तातडीने मोबदला द्या," असे निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या देदीप्यमान यशानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवनिर्वाचित ...
त्रिपक्षीय करार आणि रोजगाराची हमी
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये होणारा 'त्रिपक्षीय करार'. स्थानिक ग्रामस्थ, ताज ग्रुप आणि पर्यटन विभाग यांच्यात हा करार होणार असून, याद्वारे स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासोबतच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे. या बैठकीला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नितेश राणे यांनी शंभूराज देसाई यांचे आभार मानताना म्हटले की, "देसाईंच्या पुढाकारामुळेच अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प पुन्हा मार्गी लागला आहे." तर दीपक केसरकर यांनी स्थानिक नागरिकांनी जिल्ह्याच्या हितासाठी या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलणार?
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाचे केंद्र बनेल. उच्चभ्रू पर्यटकांचा ओघ वाढल्याने स्थानिक हॉटेल व्यावसायिक, वाहतूकदार आणि छोट्या व्यावसायिकांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.





