Tuesday, December 23, 2025

Rahul Kalate : पिंपरीत शरद पवारांना मोठा धक्का; राहुल कलाटे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून 'कमळ' हाती

Rahul Kalate : पिंपरीत शरद पवारांना मोठा धक्का; राहुल कलाटे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून 'कमळ' हाती

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला मोठे खिंडार पडले आहे. शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि चिंचवड विधानसभेचे माजी उमेदवार राहुल कलाटे यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत झालेल्या एका विशेष सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चिंचवडचे आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

सकाळपासूनच हालचालींना वेग

राहुल कलाटे हे आज सकाळी ९ वाजता आपल्या वाकड येथील निवासस्थानाहून कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून कलाटे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा त्यांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्याने या चर्चेला अधिक बळकटी दिली होती. अखेर आज सर्व शक्यतांना पूर्णविराम देत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले..

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

स्थानिक नेत्यांचा विरोध आणि वरिष्ठांचा हस्तक्षेप

राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश तितका सोपा नव्हता. चिंचवडमधील भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि काही माजी नगरसेवकांनी कलाटे यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. विशेषतः प्रभाग क्र. २५ मधील इच्छुकांनी "आयात उमेदवारांना संधी देऊ नका" अशी भूमिका घेत वरिष्ठांना इशारा दिला होता. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी या विरोधाकडे दुर्लक्ष करत कलाटेंना पक्षात घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

शरद पवार गटासाठी 'मास्टरस्ट्रोक' ठरणारा धक्का

पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा असतानाच, राहुल कलाटे यांनी मारलेली ही 'लाथ' शरद पवारांसाठी मोठा धक्का मानली जात आहे. कलाटे यांनी २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये चिंचवड मतदारसंघातून तगडी फाईट दिली होती. त्यांच्याकडे असलेली मोठी व्होट बँक आता भाजपच्या पारड्यात जाणार असल्याने महापालिकेत भाजपची स्थिती अधिक भक्कम होणार आहे.

आगामी महापालिकेचे समीकरण बदलणार?

राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे चिंचवड आणि वाकड परिसरातील राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील झाल्याने, महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गोटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता भाजप या ताकदीचा वापर करून महापालिकेवर पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा