Tuesday, December 23, 2025

Rahul Shewale : शिवसेनेत राहुल शेवाळे यांची मोठी बढती; उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती!

Rahul Shewale : शिवसेनेत राहुल शेवाळे यांची मोठी बढती; उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती!
मुंबई : शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुका आणि पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेना पक्षाच्या 'सरचिटणीस' पदी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे राहुल शेवाळे यांच्याकडे आता पक्षातील अत्यंत महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

पक्षातील स्थान झाले बळकट

राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. दक्षिण-मध्य मुंबईचे दोन वेळा खासदार राहिलेले शेवाळे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची बाजू समर्थपणे मांडली होती. आता सरचिटणीस पदाच्या माध्यमातून त्यांच्याकडे राज्यभरातील पक्ष बांधणी, समन्वयाची जबाबदारी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे.

आगामी निवडणुकांसाठी मोठी रणनीती?

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अशा वेळी मुंबईतील राजकीय गणिते आणि दांडगा अनुभव असणाऱ्या राहुल शेवाळे यांची सरचिटणीस पदी वर्णी लागणे, हा पक्षाचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. मुंबईतील प्रभागांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांचे जाळे सक्रिय करण्यासाठी शेवाळे यांचा अनुभव पक्षाला फायदेशीर ठरणार आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीनंतर शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या नेत्याला सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रभारी सरचिटणीस म्हणून राहुल शेवाळे लवकरच आपला पदभार स्वीकारतील आणि राज्यातील विविध विभागांचा दौरा करून पक्ष कार्याला गती देतील, असे संकेत मिळत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >