Tuesday, December 23, 2025

भाजपच्या रणनीतीपुढे विरोधकांचे पानिपत

भाजपच्या रणनीतीपुढे विरोधकांचे पानिपत

विरोधी पक्षांची उडाली धूळधाण

आघाडीत बिघाडी कायम

वसंत भोईर वाडा : वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीपुढे शिंदे गट, शिवसेना (उबाठा गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) या विरोधी पक्षांचे पुरते पानिपत झाले आहे.

वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ही निवडणूक लढताना संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची फौज प्रचारात उतरवली होती. प्रभाग निहाय सामाजिक गणितं ओळखून त्या त्या समाजातील विशेषतः आदिवासी व कुणबी समाजातील कार्यकर्ते प्रभागांमध्ये तळ ठोकून होते. प्रचार करताना संघटितपणे प्रचाराला प्राधान्य देत नगराध्यक्षांसह नगरसेवक यांच्या मतांमध्ये फारसे अंतर पडलेले दिसले नाही. संघटितपणे भाजपने केलेल्या प्रचारामुळे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रीमा गंधे या सुमारे ९७२ च्या मताधिक्यांनी विजयी झाल्या तर भाजपचे १७ पैकी ११ नगरसेवक निवडून आले. भाजपच्या या यशाने विरोधी पक्षांची धूळधाण उडाली.

भाजपचे प्रमुख विरोधक शिवसेना शिंदे गटाला नगराध्यक्ष पदाला पराभवाचा सामना करावा लागला, तर नगरसेवक पदी ३ जागा जिंकता आल्या. शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमांगी पाटील आणि नगरसेवक पदाचे असे १६ उमेदवार यांच्या संपूर्ण प्रचारामध्ये एक वाक्यता नसल्याने शिंदे गटाची एकूणच प्रचार यंत्रणा विस्कळित होती. शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील, निलेश सांबरे, आमदार शांताराम मोरे हे प्रचारात तळ ठोकून असले तरी शिवसेनेत असलेला बेबनाव रोखण्यात त्यांना यश आले नाही. याचा फटका शिवसेना शिंदे गटाला बसला, तर शिवसेना उबाठा पक्ष आणि काँग्रेस, बहुजन विकास आघाडी हे पक्ष एकत्रितपणे आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे गेले. परंतु या आघाडीतही बिघाडी कायम राहिल्याने ही आघाडी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. केवळ शिवसेना उबाटा एक जागा आणि काँग्रेसलाही एक जागेवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला भोपळाई फोडता आला नाही. नगरसेवक पदासाठी ७ प्रभागात उमेदवार उभे केले होते; परंतु अजित पवार गटाचे शहरात कोणत्याही प्रकारे कार्यकर्त्यांचे जाळे नसल्याने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. प्रभाग क्रमांक २ मध्ये तर नोटा पेक्षाही कमी मते मिळाल्याने अजित पवार गटाची चांगलीच नाचक्की झाली आहे. ५४३ मते मिळाली आहेत.

शरद पवार गटाने पाच जागेवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एक जागा जिंकत नगरपंचायतीत चंचू प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांच्या मतदारसंघातील वाडा नगरपंचायत असतानाही ते नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदाच्या सर्व जागांवर उमेदवार ही उभे करू शकले नाहीत. याचे आश्चर्य आहे. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या प्रचंड यशाने सर्वच विरोधी पक्षांचे अक्षरशः पानिपत झाले आहे.

Comments
Add Comment