नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत अतिरेकी हल्ला केला होता. या हल्ल्यावेळी दक्षिण मुंबईतील कामा रुग्णालयात अतिरेकी आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली होती. या चकमकीचे नेतृत्व करणारे राज्याच्या अतिरेकी विरोधी विभागाचे अर्थात अँटी टेररिस्ट स्क्वाडचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख आणि आताचे एनआयएचे (राष्ट्रीय तपास संस्था / नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) प्रमुख सदानंद दाते हे १ जानेवारी २०२६ पासून राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सूत्र हाती घेणार आहेत. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या चर्चेअंती हा निर्णय झाल्याचे समजते. लवकरच दाते यांना महाराष्ट्रात महासंचालक पदाची जबाबदारी हाताळण्यासाठी केंद्राकडून मुक्त केले जाईल आणि तशी औपचारिक घोषणा प्रसिद्धीपत्रक काढून केली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने एनआयए प्रमुख असलेले भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस / इंडियन पोलीस सर्व्हिस) १९९० च्या बॅचचे अधिकारी दाते यांना महाराष्ट्र कॅडरमध्ये परत पाठवण्यास मंजुरी दिली आहे.
सदानंद दाते १ एप्रिल २०२४ पासून एनआयएचे नेतृत्व करत आहेत. ते ३१ डिसेंबर २०२५ रोजी पदमुक्त होऊन १ जानेवारी २०२६ पासून राज्याच्या पोलीस महासंचालक या पदाची सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ३१ डिसेंबर २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. त्यांना आधीच मुदतवाढ देऊन अतिरिक्त कार्यकाळासाठी महासंचालक पदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी रश्मी शुक्ला निवृत्त झाल्यानंतर राज्याच्या पोलीस दलाचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला होता. पण केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सहमती झाल्यामुळे हा प्रश्न सुटला आहे.
सदानंद दाते यांनी आधी महाराष्ट्र एटीएस प्रमुख, मुंबई सहपोलीस आयुक्त (गुन्हे), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), कायदा व न्या विभागाचे संयुक्त सचिव अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे हाताळल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या फोर्स वन या कमांडो पथकाचेही नेतृत्व केले आहे.
काही वर्षांपूर्वी बिहारच्या राहुल राजने मुंबईत प्रवाशांसह बेस्ट बसचे अपहरण केले होते. राज ठाकरेंना ठार मारायचे आहे त्यांच्या घरी बस घेऊन चला असे म्हणत या तरुणाने दहशत निर्माण केली होती. अखेर सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चतुराईने परिस्थिती हाताळत सदानंद दाते यांनी राहुल राजला चकमकीत ठार केले होते. दातेंनी २६/११ च्या वेळी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली होती. त्यावेळी चकमकीत जखमी झालेल्या दातेंना नंतर राष्ट्रपतींनी शौर्य पदकाने गौरविले होते.
दातेंनी हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रॅम अंतर्गत मिनेसोटा विद्यापीठातून व्हाईट-कॉलर आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी उच्च शिक्षण घेतले होते. जर्मन फेडरल पोलिसांच्या विशेष युनिट GSG-9 (Grenzschutzgruppe-9) सोबतही त्यांचे विशेष प्रशिक्षण झाले आहे.






