अकोले (प्रतिनिधी) : चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो. मात्र २०१९ साली तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदल कोणी केलाॽ हे सुध्दा जनतेला कळू द्या आशा शब्दात जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी टिका करणा-यांचा समाचार घेतला. देवठाण जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकास कामांचा देवठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आणि जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे उद्घघाटन, विद्यार्थ्याना डिजीटल बोर्डाचे वितरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
देवठाण येथे झालेल्या जाहीर सभेत मंत्री विखे पाटील यांनी प्रथमच नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर भाष्य करून, रेल्वे पळविल्याचा आरोप करणा-यांना खडे बोल सुनावले. माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आ. अमोल खताळ, डॉ.जालिंदर भोर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जेष्ठ नेते सीताराम भांगरे, शिवाजीराव धुमाळे, सुधाकरराव देशमुख, रावसाहेब वाकचौरे, मारूती मेंगाळ, कैलासराव वाकचौरे, सरपंच विजया सहाणे, माजी सभापती अंतनाताई बोंबले, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी रेल्वेच्या प्रश्नावरून काहींनी शिट्या वाजवायला सुरूवात केली आहे. मात्र यांचा भोंगा जनता वाजवल्याशिवाय राहाणार नाही असा इशारा देवून, सध्या कोण कोणत्या रेल्वेच्या डब्यात बसले आणि कोणत्या डब्याला कोणाचे इंजिन जोडले गेले समजायला तयार नसल्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला. पाणी आणि रेल्वेच्या संदर्भात होत असलेल्या आरोपाचा समाचार घेतांना विखे पाटील म्हणाले की, पाणी पळवायला आम्ही तर खूप लांब आहोत, मध्ये कोण आहेत हे आधी तपासा. रेल्वेच्या बाबतीत सुध्दा देवठाणहून जाणारा प्रस्तावित मार्ग २०२१ साली महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणी बदलला हे सुध्दा पाहा. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण मंत्री होते, २०१९ मध्ये तयार केलेला प्रस्तावित मार्ग कोणी बदलला या प्रश्नाचे उत्तर सुध्दा मिळाले पाहीजे. मी तर केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना पत्र देवून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय न करण्याची तसेच बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविणार असून २०१९ साली देवठाणसह नाशिक पुणे रेल्वेच्या प्रस्तावाचा निर्णय कायम ठेवण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. या भागातील लोकांनी केलेल्या त्यागामुळे जिल्ह्याच्या पाण्याचे प्रश्न सुटले गेले.
आता या भागातील लोकांसाठी काहीतरी करायचे आहे. आहे त्या पाण्यावर अवलंबून राहाता येणार नाही. अतिरीक्त पाणी निर्माण करण्यासाठी महायुती सरकारने प्रयत्न सुरू केले असून, बिताका प्रकल्पाद्वारे २०० ते ३०० एमसीएफटी पाणी आढळा खो-यात वळविण्याकरीता सर्व्हेक्षणाच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून यासाठी आवश्यक असलेला निधी सुध्दा मंजूर करण्याचे आश्वासित केले. तालुक्यात रोजगार निर्माण करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पर्यटन धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून युवकांबरोबर महीलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी टाटा आणि रिलायन्स उद्योग समूहाच्या सहकार्याने ट्रेनिंग सेंटर उभारण्याची तयारी असल्याचे पालकमंत्री म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लोकाभिमुख योजनांचे काम होत आहे. देवठाण येथे कार्यान्वित झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यमान भारत योजनेची देण आहे. प्रत्येक समाज घटकाला विकास प्रक्रीयेत सामावून घेण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार करीत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभराव पिचड यांनी रेल्वेच्या विषयांवरून विरोधकावर टिका केली. स्व.मधुकरराव पिचड यांनी तत्कालीन मंत्री रावसाहेब दानवे यांच्या देवठाणहून रेल्वे नेण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. मात्र सध्याच्या आमदारांना आपली रेल्वे गेल्याचे समजले सुध्दा नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रस्तावात कोणी बदल केला त्यावेळी कोण मंत्री होते सर्वाना माहीत आहे. कोणतेही विकास काम सध्याच्या लोकप्रतिनिधींना करता आले नसल्याची टिका त्यांनी केली. मारूती मेंगाळ यांनी मंत्री विखे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून विकास काम होत आहेत. अधिकचा निधी द्यावा आशी मागणी करून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सातही जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आपल्या नेतृत्वाखाली विजय संपादन होईल याची ग्वाही दिली.