मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कणकवली नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलेल्या चमकदार कामगिरीनंतर त्यांचे पक्षातील वजन वाढले आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीत निलेश राणे यांनी प्रभावी रणनीती आणि संघटन कौशल्य दाखवत पक्षाला यश मिळवून दिले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे. या यशामुळे निलेश राणे यांना लवकरच शिवसेनेत नेतेपदी नियुक्ती मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सूत्रांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांच्या निवडणूक व्यवस्थापन आणि संघटन बांधणीवर समाधान मानले. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राणे यांच्यावर पक्षांतर्गत मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे. शिवाय कमी कालावधीत कोकणातील संघटनात्मक बांधणीत केलेल्या चमकदार कामगिरीची दखल घेऊन निलेश राणे यांना शिवसेना नेतेपदी बढती मिळणार असल्याचेही सांगण्यात आले.
शिवसेनेत नेते पदाला अतिशय महत्व आहे. मुख्य नेत्यानंतर शिवसेना नेते हे संघटनेतील क्रमांक दोनचे पद आहे. त्यानंतर उपनेते पदाला महत्त्व आहे. मुख्य नेत्याच्या निवडीसह पक्ष संघटनेतील अति महत्त्वाचे निर्णय नेत्यांचे मत जाणून घेतल्याशिवाय होत नाहीत.






