Tuesday, December 23, 2025

खरीप हंगाम २०२४–२५;मका,ज्वारी सह भरड धान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

खरीप हंगाम २०२४–२५;मका,ज्वारी सह भरड धान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : खरीप हंगाम २०२४–२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यास ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना विविध तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता तसेच इतर कारणांमुळे वेळेत नोंदणी करता आली नव्हती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ,आदिवासी विकास महामंडळ तसेच विविध जिल्हा स्तरावरून नोंदणीस मुदतवाढ देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शासनाच्या वतीने हा निर्णय घेतला आहे.

खरीप पणन हंगाम २०२४–२५ मध्ये धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांकडूनच शासनामार्फत आधारभूत किंमतीने धान्याची खरेदी करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, अधिकाधिक शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment