Tuesday, December 23, 2025

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

Navneet Rana :

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा समाचार घेताना, नवनीत राणा यांनी हिंदू समाजाला थेट आवाहन केले आहे. "जर समोरून उघडपणे लोकसंख्या वाढवण्याचे आव्हान दिले जात असेल, तर आपणही मागे राहता कामा नये," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

"हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा विचार"; राणांचा हल्लाबोल

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मौलाना सय्यद कादरी यांनी अलिकडेच, "मला चार बायका आणि १९ मुले आहेत," असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, "त्यांचा हा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा आहे. जर कुणी उघडपणे सांगत असेल की त्यांना इतकी मुले आहेत, तर आपण एका मुलावरच का समाधान मानायचे? मी सर्व हिंदू समाजाला आवाहन करते की, आपणही किमान तीन ते चार मुले जन्माला घातली पाहिजेत. यामध्ये कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही." लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी हिंदूंनी आता विचार करण्याची वेळ आली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

पवार कुटुंबाच्या 'मनोमिलना'वर भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर बोलताना नवनीत राणा यांनी मवाळ भूमिका घेतली. "शरद पवार हे महाराष्ट्राचे अत्यंत वरिष्ठ नेते आहेत. अजित पवार आणि शरद पवार हे शेवटी एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. अजित पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, शरद पवारांच्या सल्ल्यानेच ते भाजपसोबत गेले होते. त्यामुळे जर दोन पवार पुन्हा एकत्र येत असतील, तर ही स्वागतार्ह बाब आहे. कुटुंब एकत्र येणे कधीही चांगलेच असते," असे मत त्यांनी व्यक्त केले.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवनीत राणा यांच्या लोकसंख्या वाढीच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेषतः निवडणुकीच्या वातावरणात त्यांनी थेट 'मुलांच्या संख्ये'वरून हिंदू समाजाला साद घातल्याने विरोधकांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे पवार कुटुंबाबद्दलच्या त्यांच्या विधानाने महायुतीमधील भविष्यातील समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >