मोहित सोमण: उद्योगपती गौतम अदानी यांनी आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. आपल्या विस्तारित क्षेत्रातील छत्रछायेखाली असलेल्या दोन बड्या सिमेंट कंपन्यांचे विलीनीकरण अदानी समुहाने घोषित केले आहे. स्कीम ऑफ अमालगमेशन अंतर्गत एसीसी व अंबुजा सिमेंट या दोन्ही सिमेंट कंपन्यांचे एकत्रीकरण (Consolidation) होणार असून दोन्ही कंपन्या एका ब्रँडखालीच मोठी सिमेंट कंपनी म्हणून काम करतील अशी माहिती कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत दिली आहे. 'वन सिमेंट प्लॅटफॉर्म' असे वर्णन करून कंपनी संपूर्ण देशभरात एक नव्या ओळखीसह बाजारात येणार आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार,ही प्रकिया सेबी नियामक, भागभांडवलधारक, कर्जदार, एनसीएलटी (National Company Law Tribunal NCLT) यांच्या परवानगीने पार पडणार असून कंपनीच्या मते एक वर्षात हे विलिनीकरण होणार आहे.
सध्या अदानी सिमेंटची एकत्रित उत्पादन क्षमता (Manufacturing Capacity) १०७ एमटीपीए (MTPA) आहे. कंपनीच्या प्रकल्पात एकूण २४ एकत्रित युनिट्स, २२ ग्रिडिंग युनिट्स, ११६ रेडी मिक्स काँक्रिट प्रकल्पांचा समावेश आहे. माहितीनुसार एसीसी, ओरिएंट सिमेंट यांचे अंबुजा सिमेंटमध्ये विलीकरण होणार आहे. त्यामुळे कंपनीच्या भागभांडवल धारकांना नव्या कंपनीचे शेअर प्रदान केले जातील. संघी, पेना, ओरिएंट सिमेंट, एसीसीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव लवकरच पारित केला जाऊ शकतो जो अंबुजा सिमेंटमध्ये सामील होणार आहे. या प्रकियेनंतर अंबुजा प्रवर्तकांचा (Promoter) हिस्सा ६७.६५% वरून ६०.९४% वर जाणार आहे. सध्या अंबुजा सिमेंटचे ५०.०५% भागभांडवल एसीसी सिमेंटचे, ७२.६६% ओरिएंट, ९९.९४% भागभांडवल पेना, ५८.०८% भागभांडवल संघी सिमेंटमध्ये आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एसीसीच्या भागभांडवल धारकांना प्रत्येक १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या १०० शेअरमागे अंबुजा सिमेंट २ रूपये दर्शन मूल्य असलेल्या ३२८ इक्विटी शेअरचे वाटप करणार आहे. तसेच ओरिंएट सिमेंटच्या १ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या १०० इक्विटी शेअर्सच्या भागभांडवल धारकांना ३३ इक्विटी शेअर अंबुजा सिमेंटकडून देण्यात येणार आहे. कलम ६ (२) स्पर्धा कायदा २००२ (Competition Act 2002) अंतर्गत ही कार्यवाही होणार असून प्रलंबित परवानग्या आधारे हा निर्णय लवकरच मंजूर केला जाऊ शकतो.
कंपनीच्या विलीनीकरण धोरणामागे कारण काय?
कंपनीच्या मते ही रणनीती आखली गेली असून उत्पादनात, उत्पादन खर्चात सक्षमीकरणासाठी तसेच कंपनीच्या कामकाजात सुसुत्रीकरण करण्यासाठी, ब्रँड विस्तारित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनीने काय म्हटले?
या विलीनीकरणामुळे उत्पादन आणि लॉजिस्टिक्स नेटवर्कचे ऑपटीमाईज करून कॉर्पोरेट रचना सुव्यवस्थित करण्यासाठी तसेच ताळेबंद (Accountibility) मजबूत करण्यासाठी वाढीस चालना देण्यासाठी व बाजारातील नेतृत्व अधिक दृढ करण्यासाठी भांडवली वाटप सुलभता आणत सुसुत्रता आणल्याने समन्वयाचे फायदे मिळतील असे कंपनीने म्हटले.
कंपनीच्या मते, या विलीनीकरणामुळे नेटवर्क, ब्रँडिंग आणि विक्री प्रोत्साहन संबंधित खर्च सोपे आणि तर्कसंगतीला अनुसरून होतील. कंपनीच्या मते मार्जिनमध्ये किमान १०० रुपये प्रति मेट्रिक टनने सुधारणा होईल. विलीनीकरणामुळे खर्चात कपात, मार्जिन विस्तार आणि वाढीची उद्दिष्ट्ये साध्य करणे सुलभ होईल असेही कंपनीने यावेळी म्हटले.या एकत्रीकरणामुळे उत्पादन आणि पुरवठा साखळी कार्ये (Supply Chain) एकत्रित होतील, संसाधनांचे वाटप योग्य प्रमाणात होईल आणि एकाच व्यवसायातील अनेक संस्था कमी करून समूहाची रचना सुव्यवस्थित होईल. मंजुरी मिळाल्यानंतर, सर्व भागधारक एकाच, एकत्रित कंपनीशी संलग्न राहतील असेही कंपनीने स्पष्ट केले
हे एकत्रीकरण समूहाच्या एकत्रीकरण (Consolidation) आणि शाश्वत वाढीच्या (Sustainable Growth) या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. कालांतराने या एकत्रित रचनेमुळे भागधारकांसाठी अधिक मूल्य निर्मिती निर्माण होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे शाश्वत परतावा देण्याच्या समूहाच्या निरंतर वचनबद्धतेला साथ मिळेल असे कंपनीने अंतिमतः स्पष्ट केले आहे.






