Tuesday, December 23, 2025

सगळ्यांचेच अंदाज खरे!

सगळ्यांचेच अंदाज खरे!

मतदानोत्तर चाचण्या, सर्वेक्षणानंतर बांधलेले निवडणुकीचे अंदाजही चुकतात. पण, नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीचे अंदाज सगळ्यांचेच जवळजवळ खरे ठरले. अगदी महाविकास आघाडीच्या नेत्यांचेही! स्थानिक पातळीवरचे दोन-चार अंदाज इकडे तिकडे झाले असतीलही. पण, राज्य पातळीवरचे अंदाज सगळ्यांचेच खरे ठरले. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या जनमानसावर कब्जा केला आहे, हे उघड आहे. त्यांचा प्रभाव किती खोलवर गेला आहे, एवढाच चर्चेचा (वादाचा नव्हे!) विषय होता. त्याचं उत्तर या निकालातून मिळालं आहे. एकेकाळी शहरी उच्चवर्णीय मध्यमवर्गीयांचा पगडा असलेला हा पक्ष राज्यात तळागाळात, सर्व विभागात किती विस्तारला आहे, याचा लेखाजोखाच या निवडणुकीने सगळ्यांसमोर ठेवला आहे. भारतीय जनता पक्षाचे विरोधक भानावर असतील, तर त्यांनी या वस्तुस्थितीची दखल घ्यायला हवी. ही दखल ते घेणार नसतील आणि त्या पक्षावर केल्या जाणाऱ्या जुन्याच टीकेच्या कथानकात अडकून पडणार असतील, तर ते भानावर येईपर्यंत भाजपला त्यांचा विचारही करण्याची गरज नाही, हे महाराष्ट्रातील मतदारांनी दाखवून दिलं आहे. नगरपालिका आणि नगर परिषदांचं कार्यक्षेत्र म्हणजे महाराष्ट्राचं निमशहरी क्षेत्र. गेल्या २५ वर्षांत आजूबाजूच्या खेड्यांतून या भागात फार मोठ्या वेगाने स्थलांतर झालं. तिथे मतदारांनी जर भाजपला इतकं स्वीकारलं असेल, तर महानगरपालिका निवडणुकांनंतर येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्या पक्षाला चिंता करायचंच कारण नाही, असा निष्कर्ष आताच काढला, तरी तो चुकीचा ठरेल असं वाटत नाही. महानगरपालिका निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष असेल, असं राजकीय वर्तुळात आताच मानलं जातं आहे. ते खरं ठरलं, तर राज्यातील सत्तेपासून गावच्या कारभारापर्यंत महाराष्ट्रात भाजपचंच वर्चस्व प्रस्थापित झालं आहे, हा स्पष्ट संदेश देशात जाईल. भाजपचा महाराष्ट्रातील सर्व पातळ्यांवरचा विस्तार सिद्ध होईल. त्याचा अधिकाधिक विस्तार करत राहणं हाच त्या पक्षाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा यापुढचा कार्यक्रम असेल.

भाजप प्रत्येक निवडणूक जीवनमरणाची लढाई असल्यासारखा लढतो, हे आता देशात सगळ्यांनीच पाहिलं आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकाही त्याला अपवाद नाहीत. पक्षाची सूक्ष्म नियोजनाची एक पद्धत आहे. 'मा फलेषु कदाचन' या उक्तीनुसार फळाचा विचार न करता 'कर्मण्ये वाधिकारस्ते' वृत्तीने ते मेहनत घेतात. त्यामुळे, गेल्या ३०-३५ वर्षांत कोणत्याही निवडणुकीवर वरचष्मा भाजपचाच असतो. काँग्रेसला आधुनिक निवडणूकतंत्र अवगत नाही, असं विश्लेषणही या निवडणूक निकालानंतर काही जणांनी केलं! नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या अगदी सुरुवातीला महायुतीतील अन्य पक्ष भाजपची तयारी पाहूनच स्तिमित झाले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना त्यातूनच बळ मिळालं असावं. कारण, त्यांनीही त्यांच्या ताकदीनुसार भाजपच्या तोडीस तोड मेहनत घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यातही उजवे ठरले. पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्नशील असलेला, वर्तमान राजकारणाच्या गरजा पूर्ण करण्याची धमक असलेला आणि आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी जोखीम पत्करण्याची तयारी असलेला नेता म्हणून दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांची ओळख झाली आहे. नेत्याची ऊर्जाच कार्यकर्त्यांत पाझरत असते. शिंदे यांच्या ऊर्जेचा परिणाम म्हणून त्यांच्याच इर्षेने शिवसैनिकही निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने त्यांचे अनेक ठिकाणी महायुतीतल्याच मित्र पक्षांशी खटके उडाले. त्याचा महायुतीवर काही परिणाम झाला नाही. कारण, हा संघर्ष उंबऱ्यापर्यंत जाऊ द्यायचा नाही, याचं भान शिंदेंना अचूक आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही एकीकडे लेकाचं लग्न आणि दुसरीकडे पक्षकार्य अशा दोन्ही आघाड्यांवर लढले. शिंदे आणि पवार या दोघांनाही त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं. साधारण विधानसभा निवडणुकीसारखेच आकडे पुन्हा गाठून दोघांनीही महायुतीतली आपली उपयुक्तता सिद्ध केली.

विरोधकांमध्ये काँग्रेसला मिळालेलं यश अनेकांना आश्चर्यचकित करणारं ठरलं. ना मातब्बर नेता, ना साधनसामग्री, ना पक्षसंघटनेचा आधार, ना देशात पक्षासाठी कुठेही प्रोत्साहनात्मक वातावरण-तरीही पक्षाच्या स्थानिक शिलेदारांनी आपापले गड राखण्यासाठी मेहनत घेतली. आपल्या पक्षाची जनमानसातली पत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी राखून दाखवली. दिवाळं निघालं ते उबाठा आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन गटांचं. राजकीय इच्छाशक्ती संपलेल्या या दोन्ही पक्षांचा जनाधार झपाट्याने कमी होतो आहे. राहिलेले निष्ठावंतही पुढच्या निवडणुकीपर्यंत किती टिकतील, हा प्रश्नच आहे. म्हणजे, या दोन्ही पक्षांतील फुटलेले गटच आपल्या मूळ पक्षांची निशाणी कायम ठेवणार, हे या निवडणूक निकालांनी दाखवून दिलं आहे. येत्या महानगरपालिका निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा पुनर्रचनेकडे सरकेल! या निवडणुकांत जे (गैर) प्रकार घडले, ते मात्र महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहेत. महापालिका निवडणूक ही त्यापेक्षा अधिक ताकदवानांची लढाई आहे. ही निवडणूक पक्षांना आणि पक्षनेत्यांना कितीतरी अधिक पटीने बळ देणारी आहे. त्यामुळे, ती त्या पटीत, तेवढ्या ताकदीने लढवली जाणार, हे उघड आहे. महानगरीत जनता सुजाण असते, असं मानलं जातं. आधीच्या निवडणुकांनी मैदान साफ करून दिलं आहे. त्यामुळे, आघाडीच्या पक्षांना आता अटीतटीची ताकद लावण्याची गरज लागू नये. त्यामुळे, येथील निवडणूक गैरप्रकारांविना झाली, तर त्यातच महाराष्ट्राची शान आहे.

Comments
Add Comment