नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली. दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार देणाऱ्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला ईडीने आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ मार्च २०२६ रोजी ठेवली आहे. १६ डिसेंबर रोजी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने या दोघांविरुद्ध ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला होता. राऊस अव्हेन्यू न्यायालयाने म्हटले होते की, ईडीच्या आरोपपत्राची दखल खासगी तक्रारीच्या आधारे घेतली जाऊ शकत नाही. ईडीने या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल)वर त्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याच्या गांधी कुटुंबाच्या युक्तिवादाला अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) एसव्ही राजू यांनी विरोध केला.






