जलवाहिनी आणि पर्जन्य जलवाहिनींमुळे खर्चात वाढ
एका सरकत्या जिन्याचे बांधकाम केले रद्द
मुंबई : वांद्रे पूर्व येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या स्कायवॉकचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात असून या स्कायवॉकचा खर्चही आता तब्बल १७ कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. या स्कायवॉकच्या बांधकामामध्ये मोठ्या व्यासाची जलवाहिनी तसेच पर्जन्य जलवाहिनी आल्याने या बांधकामाचा खर्च वाढला आहे, तर येथील भूमिगत गटारामुळे एका सरकत्या जिन्याचे बांधकामही रद्द करण्यात आले आहे.
वांद्रे पूर्व येथील रेल्वे स्थानकापासून ते पश्चिम द्रुतगती महामार्ग पार करून म्हाडा कार्यालयापर्यंत महापालिकेच्यावतीने स्कायवॉक बांधण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने विविध करांसह १०६ कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु आता हा खर्चात वाढ होऊन विविध करांसह याचा खर्च १२३ कोटींवर जावून पोहोचला आहे. महापालिकेने या कामांसाठी श्री. मंगलम बिल्डकॉन (आय) प्रा. लि. या कंपनीची निवड केली होती आणि त्यांच्यामार्फत हे काम सुरु आहे. हे काम चालू असतानाच खांब क्र. २४, २५, येथे २४०० मिमी. व्यासाची जलवाहिनी आढळून आली. त्यामुळे याठिकाणी खांब बांधता येत नसल्याने याचे बांधकाम दुसरीकडून वळवले. तसेच बेस्ट डेपो वांद्रेपर्यंत ही आकाशमार्गिका एक अतिरिक्त मार्गिका बांधण्याची आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील खांब क्र. ३० जवळ म्हाडा गल्ली येथे अतिरिक्त जिना लावण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती; परंतु खांब क्र. ५ ते १२ पर्यंत ३०० मिमी. व्यासाची जलवाहिनी आढळून आल्याने ती स्थलांतरीत करण्यात आली.
स्कायवॉकचे बांधकाम सुरू असताना खांब क्र. पी-१ ते पी-३ येथे १८०० मीमी व्यासाच्या तीन जलवाहिन्या अस्तित्वात असल्यामुळे मुख्य जलवाहिन्यापासून चार मीटर इतके अंतर सोडून फाऊंडेशनचे काम करणे शक्य नसल्याचा अभिप्राय सल्लागारांनी दिला. त्यामुळे या स्कायवॉकच्या बांधकामातून खांब क्र. पी-१ ते पी-३ हा अंदाजित ७० मीटर भाग वगळण्यात आला आहे. तसेच एकूण ३ सरकते जिने बांधण्याचे प्रस्तावित होते; परंतु खांब क्र. पी-३३ येथे पर्जन्य जलवाहिनीचा भूमिगत प्रमुख नाला असल्याने तेथे सरकता जिना व त्यासाठी लागणारे मशीन रूम बांधता येणे शक्य नसल्यामुळे एका सरकत्या जिन्याचे काम कमी करून एकूण तीन सरकत्या जिन्यांपैकी फक्त दोन सरकत्या जिन्याचे काम करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे म्हाडा गल्लीपर्यंत अतिरिक्त जिना वाढवण्यासह इतर वाढीव कामांमुळे हा खर्च वाढला गेला असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.






