बडगाम : जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातल्या एनआयए कोर्टाने मंगळवारी एक मोठा निर्णय दिला. अमेरिकेत राहणाऱ्या काश्मिरी लॉबिस्ट डॉ. गुलाम नबी शाह उर्फ डॉ. फई याची ०.०७६ हेक्टर जमीन जप्त करण्याचे आदेश दिले. जज याहया फिरदौस यांनी हा आदेश दिला.
डॉ. गुलाम नबी शाह उर्फ डॉ. फई याला यूएपीए अंतर्गत फरार आरोपी जाहीर करण्यात आले आहे. अद्याप या आरोपीला अटक झालेली नाही. यामुळेच कोर्टाने आरोपीच्या जमिनीची जप्ती करण्याचे आदेश दिले.
सध्या डॉ. गुलाम नबी शाह उर्फ डॉ. फई अमेरिकेत वॉशिंग्टन येथे वास्तव्यास आहे. तो वर्ल्ड फोरम फॉर पीस अँड जस्टिस आणि काश्मिरी अमेरिकन काउंसिल नावाच्या संस्थांचा चेअरमन आहे. या आरोपीला यूएपीए अंतर्गत फरार आरोपी जाहीर करण्यात आले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार यूएपीए अंतर्गत फरार जाहीर केलेली व्यक्ती तीस दिवसांत शरण आली नाही तर त्या व्यक्तीची वैयक्तिक संपत्ती जप्त करण्याचे अधिकार सरकारला मिळतात. या तरतुदीनुसार कोर्टाने डॉ. गुलाम नबी शाह उर्फ डॉ. फईची जमीन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार डॉ. गुलाम नबी शाह उर्फ डॉ. फई आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेशी संबंधित आहे. यामुळेच कोर्टाने देशविरोधी कृत्य प्रकरणी डॉ. गुलाम नबी शाह उर्फ डॉ. फईची जमीन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.






