मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरता मंगळवारी २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख उजाडली असली तरी अद्यापही राजकीय पक्षांच्या आघाडीचा निर्णय झालेला नाही की उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र, पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. आयत्या वेळेला उमेदवारी जाहीर झाल्यास कोणतीही फसगत होऊ नये, हातची संधी निसटू नये यासाठी प्रत्येक पक्षाचा इच्छुक उमेदवार कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे.
मुंबई महापालिकेच्या २५-२ ६च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता येत्या २७ डिसेंबर रोजी मतदान केंद्र निहाय मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. तर यासाठी २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत अर्ज दाखल करताना त्यासाठीची आवश्यक जसे की जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र,शौचालय वापर प्रमाणपत्र, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता कर आणि पाणी पट्टी थकीत नाही असे प्रमाणपत्र, तसेच पोलिसांच्या वतीने चारित्र्य प्रमाणपत्र, गुन्ह्यांची सर्व माहिती आदी प्रमाणपत्र संबंधित विभागांकडून संकलित करून अर्जा सोबत जोडावी लागणार आहे. परतू, माजी नगरसेवक आहेत, आणि ज्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे ते सर्व इच्छुक उमेदवार अशाप्रकारची सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ करत आहेत. तसेच प्रथमच इच्छुक आहेत परंतु पक्षाकडून उमेदवारी मिळण्याबाबत कोणत्याही सूचना नाही, मात्र त्यांना विश्वास आहे, असे इच्छुक उमदेवारही महापालिका आणि पोलिस दप्तरी चकरा आवश्यक कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महापालिकेच्या कार्यालयासह पोलिस स्थानक तसेच ऑनलाइन अर्जांचा पाऊस या दोन्ही ठिकाणी पडल्याचे तसेच त्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे
विशेष म्हणजे भाजप, उबाठा, शिवसेना, मनसे, काँग्रेस, वंचित, यासह इतर राजकीय पक्षांच्या वतीने कोणत्याही सूचना देण्यात आल्या नसल्याने अनेक उमेदवार प्रतीक्षेत आहेत. तरीही धावपळ करावी लागू नये यासाठी मग इच्छुक उमेदवार हे आता ही सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी अर्ज करताना दिसत आहेत. तसेच काही चाणाक्ष नवीन इच्छुक उमेदवार गाफिल न राहता संबंधित विभागाकडे अर्ज दाखल करत असल्याने महापालिकेचे विविध विभाग तसेच पोलिस विभागावर काही प्रमाणात ताण आल्याचे दिसून येत आहे.






