मुंबई : मुंबई सेंट्रल परिसरात वर्दीतील पोलिसानेच एका गतिमंद तरुणीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली . साने गुरुजी मार्गावरील भाऊसाहेब हिरे उद्यानात हा प्रकार घडला असून, संतप्त नागरिकांनी संबंधित पोलिसाला चोप देत ताडदेव पोलिसांच्या ताब्यात दिले.
हिरे उद्यानात लहान मुले आणि नागरिक मोठ्या संख्येने फेरफटका मारण्यासाठी येतात. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एक गणवेशातील पोलीस तरुणीसोबत बसलेला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही वेळातच तो तिच्याशी लगट करत अश्लील चाळे करू लागल्याने नागरिक संतप्त झाले.
प्रकार लक्षात येताच जमलेल्या नागरिकांनी पोलिसाला पकडून मारहाण केली. विशेष म्हणजे, उद्यानाला लागूनच पोलिस चौकी असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माहिती मिळताच ताडदेव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नशेत असलेल्या सहायक फौजदाराला ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत पीडित तरुणी गतिमंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित सहायक फौजदार सशस्त्र पोलिस दलात कार्यरत असून सध्या ‘एल विभाग-२’ येथे नेमणुकीस होता. या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.






