Tuesday, December 23, 2025

पोलिसांसमोर २२ नक्षलवादी आले शरण

पोलिसांसमोर २२ नक्षलवादी आले शरण

मलकानगिरी : मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशा पोलिसांसमोर २२ नक्षलवादी शरण आले. आपल्या हातातील शस्त्र टाकून माओवादी नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती स्वीकारली. शरण आलेल्या सर्व नक्षलवाद्यांची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी लाखो रुपयांची बक्षीसं जाहीर केली होती. यामुळेच ही शरणागती पोलिसांच्यादृष्टीने महत्त्वाची आहे.

शरण आलेल्या नक्षलवाद्यांना नियमानुसार पुनर्वसनासाठी सरकारकडून आवश्यक ती आर्थिक मदत आणि कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा पूर्ण सहकार्य करेल.

ओडिशा पोलिसांसमोर शरण आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक विभागीय प्रमुख, सहा एसीएम आणि १५ पार्टी सदस्य आहेत. या नक्षलवाद्यांवर साडेपाच लाख रुपयांपासून २७.५० लाख रुपयांपर्यंतची बक्षीसं होती.

ओडिशातील कालाहंडी, कंधमाल, बालनगीर, मलकानगिरी, कोरापुट, नबरंगपूर, नुआपाडा, रायगडा आणि बौध जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांचा प्रभाव आहे. यापैकी सहा जिल्हे माओवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्तीसगडच्या सीमेवर आहेत. यामध्ये कोरापुट, मलकानगिरी, कालाहांडी, नबरंगपूर, नुआपाडा आणि बालनगीर जिल्ह्यांचा समावेश आहे. पण २२ प्रमुख नक्षलवादी शरण आल्यामुळे ओडिशातील नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment