पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा पुढील काही तासांत होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. यानंतर दोन्ही पक्षांनी आघाडी करुन निवडणूक लढवण्याचे नियोजन सुरू केल्याचे वृत्त आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचे समजते.
महाराष्ट्रात फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांमध्येच आघाडी करायची की राज्यातील इतर महापालिकांमध्येही राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची याबाबतचा निर्णय शरद पवार गटाने अद्याप घेतलेला नाही. लवकरच अंतिम निर्णय होईल आणि त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असे समजते. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप - शिवसेना युती लढण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच केले होते. आता ही बाब वास्तवात येताना दिसत आहे.






