१९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी युद्ध करून पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती केली. पण तो बांगलादेश आज हिंसाचाराच्या आणि सरकारविरोधी निदर्शनांच्या आगीत होरपळतोय. काल परवा तेथे शरीफ उस्मान हादी या विद्यार्थी नेत्याची हत्या झाली आणि त्यानंतर तेथे जो हिंसाचार उफाळला त्यातून देश सावरलाच नाही. बांगलादेश हा शेख हसीना यांची राजवट होती, तेव्हापर्यंत शांत निदान भासत तरी होता. पण तेथील विद्यार्थ्यांनी उठाव करून राखीव जागांविरोधी आंदोलन केले आणि हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर बांगलादेश कधीही शांत झाला नाही. तेथील हिंदूंना या हिंसाचाराचा सर्वाधिक त्रास होत आहे आणि या हिंदूंचे रीतसर शिरकाण सुरू आहे. तेथील अल्पसंख्याक हिंदूंची हत्या होणे हे चिंताजनक आहे. एका हिंदू इसमाला दंगलखोरांनी मारहाण करून ठार मारल्याची घटना घडली आणि तेथील मोहम्मद युनूस सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. हा खरं तर त्या सरकारचा आगीशी खेळ आहे. कारण याचे फारच गंभीर परिणाम होतील आणि युनूस यांना सध्या याची जाणीव नाही. उस्मान हादी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस प्रचंड प्रमाणात गर्दी जमली होती. यावरून हाच निष्कर्ष काढता येतो की बहुसंख्य जनता ही भारतविरोधी आहे.
बांगलादेशात आता निवडणुका होत आहेत. त्यामुळे परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. खास करून भारतीयांसाठी. बांगलादेश सरकारविरोधात आंदोलन चरमसीमेवर पोहोचले असताना एका तरुण नेत्याची हत्या करण्यात आली आणि त्याला चिथावणी देणारे बांगलादेशी लोक होते. त्यामुळे अशा कृत्यांना कुणाची मान्यता असणार, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या गदारोळामध्ये दोन मीडिया हाऊसेसची कार्यालये दंगलखोरांनी जाळली आणि कर्मचाऱ्यांना कसेबसे पळून जावे लागले. बांगलादेशात मीडियाची इतकी दारुण अवस्था कधीही नव्हती. अगदी भारत बांगलादेश युद्धातही नव्हती. आता बांगलादेशी लोक भारतीयांविरोधात आपला राग अकारण काढत आहेत, पण ते विसरत आहेत की त्यांना याची शिक्षा पुरेपूर होऊ शकते. भारताने ठरवले तर बांगलादेशला कधीही धडा शिकवू शकतो. पण त्यापेक्षाही हे महत्त्वाचे आहे, की बांगलादेशात ज्या अविचारी शक्तींनी देश हाती घेतला आहे, त्यांना हे माहीत नाही की ही स्थिती देशात अस्थिरता आणू शकते. उस्मान हादीच्या हत्येनंतर देश आता अशांततेने ग्रासला आहे. बांगलागदेशात हिंदूवर अत्याचार आणि त्यांच्या हत्या होण्याच्या घटना घडत आहेत आणि हे चांगले नाही. बागंलादेशसाठी नाही आणि भारतासाठी तर नाहीच नाही. कारण भारत आणि बांगलादेश यांच्यात पूर्वी सलोख्याचे संबंध होते. पण बांगलादेशात हसीना यांची सत्ता गेल्यानंतर तेथे मोहम्मद युनूस यांचे सरकार आले आणि आज देश त्यांच्या हातात आहे की काय अशी स्थिती झाली आहे. बांगलादेश आता पाकच्या वळचणीला जाऊ पाहत आहे आणि हाच धोका आहे. कारण पाक-भारताचे प्रत्यक्षात तर काही वाकडे करू शकत नाही, पण अशा आडवळणाने पाक भारताला त्रास देऊ शकतो. बांगलादेशात आता अल्पसंख्याकांना म्हणजे हिंदूना वाढता धोका निर्माण झाला आहे. ईशनिंदाचे आरोप करणे हे हिंदूच्या छळाचे कारण आहे. हिंदूंची हत्या झाली त्याला हेच कारण होते. त्यामुळे एकेकाळी हिंदू-मुस्लीम सद्भावानेच्या वातावरणात जगत असलेला देश आज परस्परांचा शत्रू बनला आहे. भारत-बांगलादेश यांच्यात एकेकाळी मधुर संबंध होते आणि बांगलादेशाचे निर्माते शेख मुजीबूर रहमान यांच्याशी तत्कालीन काँग्रेस सरकारचे अत्यंत चागंले सबंध होते. मुळात भारतानेच बांगलादेशाच्या निर्मितीला मदत केली होती. पाकिस्तानी सैनिकांच्या अत्याचारापासून बांगलादेशी नागरिकांना वाचवले होते. मात्र आज तशी परिस्थिती राहिली नाही आणि बांगलादेशाची अवस्था नाजूक झाली आहे. हादीच्या हत्येनंतर युनूस सरकार ग्रेटर बागंलादेशचे स्वप्न पाहत आहे, जे की शक्य नाही. ज्याची व्याप्ती बंगाल, ओडिशा आणि बिहारपर्यंत जाऊ शकते. म्हणूनच युनूस सरकार आता बांगलादेशातील निवडणुका कट्टरपंथीयांच्या जोरावर जिंकू पाहत आहे. भारतात मिनी बांगलादेशीयांची वस्ती ठिकठिकाणी आहे आणि त्यांना कायदेशीर कागदपत्रे आपल्याकडील काँग्रेसनेत्यांनीच मिळवून दिली होती.
बांगलादेशने आता हादीच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला असला तरीही त्याच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही, त्यामुळे बांगलादेश हादीच्या हत्येच्या आगीत अजूनही जळतच रहाणार आहे. आता यातून मार्ग काढण्यासाठी युनूस सरकारपुढे एकच मार्ग आहे, तो म्हणजे शांतता आणी सलोख्याचे आवाहन करणे आणि भविष्यात अशी भडक हिंसा घडणार नाही याची काळजी घेणे. पण युनूस सरकार त्याबाबतीत कसे वागते हे पाहावे लागेल. या दंगलीत हल्लेखोरांनी दैनिकावर हल्ले केले. बांगलादेश अजूनही प्रचंड मागास आहे. त्यामुळे अर्धी लोकसंख्या इंटरनेटपासून वंचित आहे. पण अशा लोकांना भावना भडकावणे सोपे असते आणि तेच बाांगलासरकारने केले. त्यातही भारताच्या विरोधात भडकावण्याने लोक खरेखोट्याची शहानिशा न करता सरकार सांगतील त्या बाबींवर विश्वास ठेवतात. त्याचा फटका भारताला बसला. ज्या दैनिकांची कार्यालये जाळली त्यांच्या संपादकानी हा दिवस स्वतंत्र पत्रकारितेसाठी काळा दिवस असल्यचे म्हटले आहे. देशाची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य कुणीही करू नये पण युनूस सरकारला धर्मांध शक्तींपुढे न झुकता कारवाई करावी लागेल, तरच बांगलादेश या संकटातून बाहेर पडेल. बांगलादेश हिंसाचारात कुणाचा हात आहे आणि कुणाचे अंतस्थ हेतू आहेत हे कळण्यासाठी घटनेची चौकशी होऊन दंगेखोर समोर आले पाहिजे ही प्रत्येक देशवासीयाची इच्छा आहे. त्याला युनूस यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांचे सरकार लेचेपेचे नाही हे त्यांनीच दाखवून दिले पाहिजे. अन्यथा त्यांची गत खलिदा झिया यांच्यासारखी होईल. या गोंधळाचा उपयोग करून मोहम्मद युनूस कदाचित निवडणुका पुढे ढकलतील किंवा कट्टरपंथीयांची सहानुभूती मिळवतील. तसे झाले तर लोकशाहीचा पराभव होईल.