मुंबई : राज्यातील २८८ नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने राज्यभरात घवघवीत यश मिळवले असून, भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तीन ते चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत जनतेने विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत महायुतीला कौल दिला. महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला असून, त्यांचा प्रभाव नाममात्र राहिला.
राज्यातील एकूण २८८ नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल रविवारी (२१ डिसेंबर २०२५) जाहीर झाले. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू झाली आणि संध्याकाळपर्यंत बहुतांश निकाल स्पष्ट झाले. महायुतीला सुमारे २१४ हून अधिक जागांवर विजय मिळाला, तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा आणि स्थानिक आघाड्या तथा अपक्षांना २५ जागा मिळाल्या. विशेष म्हणजे, एकट्या भाजपचे १२९, नगराध्यक्ष आणि ३ हजार ३२५ नगरसेवक निवडून आले. उबाठा आणि शरद पवार गटाला दोन आकडी संख्या देखील गाठता आलेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान "२० तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर पुढची पाच वर्षे तुमची काळजी देवाभाऊ घेईल", असे आवाहन केले होते. ते जनतेला भावले. या निवडणुकीत भाजपने १२९ नगराध्यक्षपदे मिळवली, तर महायुतीचे घटकपक्ष शिवसेना ५१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ जागा जिंकल्या.
कोणाच्या किती जागा?
पक्ष नगराध्यक्ष सदस्य
भाजप १२९ ३३२५
शिवसेना (शिंदे) ५१ ६९५
राष्ट्रवादी (अजित पवार) ३३ ११
काँग्रेस ३५ १३१
उबाठा ९ ३७८
शरद पवार गट ७ १५३
महाराष्ट्रातील जनतेने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजप आणि महायुतीला दिलेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या निवडणुकीत मिळणारे यश हे विकासाच्या दृष्टिकोनावरील विश्वास अधोरेखित करतो. महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. तळागाळातील भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रमांचे हे यश आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मागील नगराध्यक्ष संख्या
भाजप : ९४
शिवसेना : ३६
काँग्रेस : ५१
राष्ट्रवादी : २९
इतर : २८
अपक्ष : २
सिंधुदुर्गात महायुतीची बाजी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व मालवण नगर परिषद तसेच कणकवली नगरपंचायत निवडणुकीत वेंगुर्ला, सावंतवाडीत भाजपने आपली सत्ता कायम राखतानाच मोठा विजय संपादीत केला. सावंतवाडीत श्रद्धाराजे भोसले ५ हजार ७८८ मते मिळवत मोठ्या फरकाने विजय मिळविला. तर वेंगुर्लेत दिलीप गिरप यांनी २ हजार ५४९ मतांनी विजयाचा गुलाल उधळला. तर मालवणमध्ये शिवसेनेने वर्चस्व राखत नवा इतिहास घडवला. ममता वराडकर येथे १ हजार मताधिक्क्याने विजयी झाल्या. कणकवली नगरपंचायतीत मात्र भाजप आणि शहर विकास आघाडीत अटीतटीची लढत झाली. शेवटच्या फेरीपर्यंत नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकर आणि समीर नलावडे यांच्यात कडवी लढत होती. या लढतीत संदेश पारकर यांनी १४५ मतांनी विजय मिळवला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी आणी वेंगुर्लेत भाजपने दमदार कामगिरी केली. तर मालवण आणि कणकवलीत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वातील उमेदवार विजयी झाले. या चारही शहरात भाजपचे तब्बल ४० नगरसेवक विजयी झाले. तर शिवसेनेचे १८ तर उ. बा. ठा. ५, काँग्रेसचे १ नगरसेवक विजयी झाले.
- भाजपची निर्विवाद आघाडी
- शिवसेना, राष्ट्रवादीलाही पसंती
- आघाडीत काँग्रेसचेच अस्तित्व
- उबाठा, शरद पवार गटाची अवस्था दयनीय
- भागनिहाय निकाल विदर्भ (१०० जागा) : भाजप ५८, शिवसेना ८, राष्ट्रवादी ७, काँग्रेस २३, उबाठा ०, शरद पवार ०, इतर ४.
- मराठवाडा (५२ जागा): भाजप २५, शिवसेना ८, राष्ट्रवादी ६, काँग्रेस ४, उबाठा ४, शरद पवार २, इतर ३.
- उत्तर महाराष्ट्र (४९ जागा): भाजप १८, शिवसेना ११, राष्ट्रवादी ७, काँग्रेस ५, उबाठा २, शरद पवार १, इतर ५.
- पश्चिम महाराष्ट्र (६० जागा) : भाजप १९, शिवसेना १४, राष्ट्रवादी १४, काँग्रेस ३, उबाठा १, शरद पवार ३, इतर ६.
- कोकण (२७ जागा): भाजप ९, शिवसेना १०, राष्ट्रवादी १, काँग्रेस ०, उबाठा २, शरद पवार १, इतर ४.
भाजप क्रमांक एकचा पक्ष असल्याचे पुन्हा अधोरेखित
महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि महायुतीला प्रचंड मोठे समर्थन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. एकूण निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांपैकी ७५ टक्के नगराध्यक्ष हे महायुतीचे असतील, असे भाकीत मी यापूर्वीच वर्तवले होते. जनतेने तसाच कौल दिला असून, भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. भाजपचे १२९ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. महायुतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नगरसेवकांच्या पदांमध्ये भाजपने एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. २०१७ साली आमचे १ हजार ६०२ नगरसेवक होते आणि आता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त ३ हजार ३२५ नगरसेवक निवडून आले आहेत. एकूण नगरसेवकांच्या संख्येपैकी ४८ टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक निवडून आले असून आम्हाला प्रचंड मोठे जनसमर्थन निवडून आले आहेत. आमचे सहयोगी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही पक्षांनी चांगली कामगिरी केली असून त्यांचे अभिनंदन करतो.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आगामी महापालिका निवडणुकीत असेच यश मिळेल जसे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले, त्याचप्रकारे नगरपालिका आणि नगर पंचाययतींच्या निवडणुकीत मिळाले आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन करतो. भाजपलाही चांगले यश मिळाले आहे. भाजप नंबर एकचा पक्ष बनला आहे. भाजपने सेंच्युरी मारली, तर शिवसेनेने हाफ सेंच्युरी मारली आहे. असेच यश आगामी महापालिका निवडणुकीत मिळेल, असे संकेत आजच्या निकालातून मिळत आहेत. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या राजकारणाची प्रचिती
लोकशाहीच्या या उत्सवात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मतदारराजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. ही निवडणूक केवळ विजयाची नाही, तर जनतेच्या विश्वासाची, विकासाच्या दिशेनं घेतलेल्या वाटचालीची आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या राजकारणाची पावती आहे. प्रत्येक मतदार बंधू-भगिनींनी दिलेलं प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा हा आमच्या कामाची खरी ऊर्जा आहे. या ऐतिहासिक यशासाठी सर्व मतदारराजांचे मनापासून कोटिशः आभार!- अजित पवार, उपमुख्यमंत्री
जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही
"विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही. महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजप-महायुतीच विजयाचा विक्रम रचेल. ३ हजारांहून अधिक नगरसेवक एकट्या भाजपचे निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेला देण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. म्हणून जनतेनेदेखील ठरवले की, त्यांना देण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे दोन अंकी संख्यादेखील ते गाठू शकले नाहीत."- रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष
विकास हाच केंद्रबिंदू मानून सिंधुदुर्गात सर्वांना न्याय
लोकशाहीमध्ये जनतेने दिलेल्या मताचा आदर ठेवावा लागतो. त्यामुळे जनतेने दिलेला निकाल आम्ही स्वीकारतो. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून उमेदवाऱ्यांच्या मागण्या आणि अपेक्षा नियोजन स्वरूपात माझ्याकडे आल्यास कोणताही पक्षपात न करता शंभर टक्के न्याय देऊ. विकास हाच केंद्रबिंदू मानून सरकारच्या वतीने जी मदत लागेल ती उभी करणे ही माझी जबाबदारी असेल.- नितेश राणे, सिंधुदुर्ग पालकमंत्री
शून्य अधिक शून्य बेरीज शून्यच
हिंदुत्व सोडून बाकी काँग्रेसच्या बुडत्या जहाजात जे गेले ते जवळपास काँग्रेससह बुडाल्यात जमा आहेत. अजूनही मोठे पराभव बाकीच आहेत, म्हणून पुन्हा एकदा सांगतो शुन्य अधिक शुन्य बेरीज शुन्यच.”- आशीष शेलार, कॅबिनेट मंत्री






