मंचर : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांत अनेक ठिकाणी अत्यंत चुरशीचे आणि धक्कादायक निकाल लागले. काही ठिकाणी अवघ्या एका मताने विजय-पराभव ठरला, तर काही ठिकाणी चिठ्ठीनेच निकाल दिला. मंचर नगरपंचायतीत घडलेला असाच एक अनोखा निकाल सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो आहे.
मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीचा आधार घ्यावा लागला. पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी दोन्ही उमेदवारांना समान कौल दिल्याने अंतिम निर्णय नशिबावर सोडण्यात आला.
या प्रभागात शिंदे शिवसेनेकडून लक्ष्मण मारुती पारधी तर भाजपकडून ज्योती संदीप बाणखेले रिंगणात होते. निवडणुकीच्या निकालात दोघांनाही प्रत्येकी २२३ मते मिळाल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेतला.
चिठ्ठी उघडताच लक्ष्मण पारधी यांचं नाव बाहेर आलं आणि नगरसेवक पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. चिठ्ठीने विजय निश्चित होताच लक्ष्मण पारधी आणि त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. दुसरीकडे, समान मते मिळूनही ज्योती बाणखेले यांना मात्र नशिबाने साथ दिली नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
मंचरमधील हा निकाल लोकशाहीत मतांइतकंच नशिबालाही कधी कधी महत्त्व येतं, याचं जिवंत उदाहरण ठरत असून या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.