मुंबई : सासू आणि सुनेमधील खट्याळ नात्याची मजेशीर झलक दाखवणारा केदार शिंदे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ सध्या चर्चेत आहे. हटके नाव आणि धमाकेदार टीझरनंतर आता या चित्रपटाचं पहिलं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, या गाण्यात सासू-सुनेच्या रोजच्या नोकझोक, टोमणे, प्रेम आणि मस्तीचं पद्धतीने चित्रण करण्यात आलं आहे.
सिनेमातील शीर्षकगीतात सासू सुनेच्या नात्यातील टोमण्यांपासून ते तक्रारींमागील आपुलकीपर्यंत भावना या गाण्यात अचूक मांडल्या आहेत. या गाण्याला वैशाली सामंत आणि प्रियांका बर्वे यांच्या दमदार आवाजाची जोड मिळाली असून, या गाण्याचे शब्द वलय मुलगुंड यांनी लिहिले.
गाण्यात निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे पारंपरिक नऊवारी साडीत दिसत असून, दोघीही प्रेक्षांच्या लाडक्या अहिनेत्री आहेत गाण्याबाबत दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, सासू-सुनेचं नातं नेहमीच रंजक, भावनिक आणि गंमतीशीर असतं. या गाण्यात त्या नात्याची खट्याळ बाजू मजेशीर पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल आणि प्रत्येक मंगळागौर कार्यक्रमात ते वाजेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि सना शिंदे यांनी केली आहे. कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांचे असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. हा मनोरंजक चित्रपट १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






