Monday, December 22, 2025

Rohit Sharma...२०२३ वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी लागला; क्रिकेट कायमचा सोडण्याचा विचार केला होता

Rohit Sharma...२०२३ वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी लागला; क्रिकेट कायमचा सोडण्याचा विचार केला होता

मुंबई : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाबाबत मनमोकळं वक्तव्य केलं आहे. त्या पराभवाने आपण पूर्णपणे खचून गेलो होतो आणि त्या काळात क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, असा विचार मनात आला होता, असं रोहित शर्माने सांगितलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यातील पराभव जिव्हारी लागलेला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या त्या पराभवानंतर आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचल्यासारखं वाटत होतं, असंही रोहितने नमूद केलं. त्या वर्ल्ड कपसाठी आपण २०२२ मध्ये कर्णधारपद स्वीकारल्यापासूनच सर्वस्व पणाला लावलं होतं, असं त्याने स्पष्ट केलं.

भारतामध्ये झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत ११ सामन्यांत ५४.२७ च्या सरासरीने ५९७ धावा केल्या होत्या. मात्र, अंतिम फेरीत भारतीय फलंदाज अपेक्षेप्रमाणे खेळ करू शकले नाहीत. भारताने २४० धावांचं आव्हान उभं केलं होतं, जे ऑस्ट्रेलियाने सहज पार केलं.

या पराभवानंतर संपूर्ण देश निराश होता. जे घडलं त्यावर विश्वास बसत नव्हता, असं सांगत रोहित म्हणाला की वैयक्तिक आयुष्यातील तो काळ त्याच्यासाठी अत्यंत कठीण होता. त्या क्षणी मला आता यापुढे आणखी क्रिकेट खेळायचं नाही, असं प्रामाणिकपणे वाटलं होतं, असंही रोहितने कबूल केलं.

मात्र, या अपयशानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दमदार पुनरागमन केलं. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताने विजेतेपद पटकावलं. त्यानंतर रोहितने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पुढे कसोटी क्रिकेटमधूनही त्याने निवृत्ती घेतली असून सध्या तो भारतासाठी केवळ वनडे क्रिकेट खेळत आहे.

Comments
Add Comment