Monday, December 22, 2025

भारत दौऱ्यातून मेस्सीला ८९ कोटींची कमाई, भारताला कररूपाने ११ कोटींचे उत्पन्न

भारत दौऱ्यातून मेस्सीला ८९ कोटींची कमाई, भारताला कररूपाने ११ कोटींचे उत्पन्न

मुंबई  : लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने नुकताच भारताचा दौरा केला होता. कोलकाता येथे झालेल्या १३ डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला होता. सॉल्ट लेक मैदानातून मेस्सी १० मिनिटांत निघून गेल्यानंतर मैदानातील प्रेक्षकांनी खुर्च्यांची मोडतोड करत जाळपोळ केली. यानंतर पश्चिम बंगाल सरकारने कार्यक्रमाचा मुख्य आयोजक सत्यद्रू दत्तावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

दत्ता याने सांगितले की, भारताच्या दौऱ्यासाठी मेस्सीला ८९ कोटी रुपये मिळाले. तर भारताला कराच्या रुपातून ११ कोटी रुपये मिळाले, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. पश्चिम बंगालने कोलकाता इव्हेंटची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीसमोर बोलताना दत्ता यांनी वरील माहिती दिली. मेस्सीच्या दौऱ्याचा एकूण खर्च १०० कोटी रुपये झाला आहे. यातील ३० टक्के रक्कम प्रायोजकांमार्फत तर ३० टक्के रक्कम तिकिटांमधून गोळा करण्यात आली. कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या इव्हेंटसाठी हजारो लोकांनी महागडी तिकीटे विकत घेतली होती. लिओनेल मेस्सीभोवती अनेक लोकांचा गराडा असल्यामुळे स्टेडियममधील लोकांना मेस्सी दिसतच नव्हता. त्यामुळे चिडलेल्या लोकांनी स्टेडियममध्ये गोंधळ घालत मोडतोड केली. सत्येद्रू दत्ताने एसआयटीसमोर झालेल्या चौकशीत म्हटले की, कोलकाताच्या इव्हेंटसाठी केवळ १५० जणांना पासेस देण्यात आले होते. मात्र काही प्रभावशाली व्यक्तींनी स्वतःच अनेक लोकांना मैदानावर आणले. त्यामुळे मेस्सीच्या भोवती खूप गर्दी गोळा झाली. सदर प्रभावशाली व्यक्ती मैदानात शिरल्यानंतर कार्यक्रमाची लय बिघडली आणि वेळापत्रक कोलमडले, त्यामुळे परिस्थिती चिघळली.

Comments
Add Comment