नगराध्यक्षपदी रुचिता घोरपडे, नगरसेवक संख्येत बरोबरी
बदलापूर : कुळगाव–बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शिवसेना (शिंदे गट) यांना मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक ७ हजार ६३४ मतांच्या फरकाने जिंकत शिवसेनेचा बालेकिल्ला हादरवला. घोरपडे यांना ६४ हजार ६०४ तर शिवसेनेच्या वीणा वामन म्हात्रे यांना ५६ हजार ९७० मते मिळाली. नगराध्यक्षपद भाजपकडे गेले असले, तरी नगरसेवकांच्या संख्येत मात्र भाजप आणि शिवसेना समान पातळीवर राहिली.
पालिकेतील कथित भ्रष्टाचार, शिवसेनेतील घराणेशाहीचे आरोप (एकाच कुटुंबातील सहा उमेदवार), तसेच भाजपचा आक्रमक व नियोजनबद्ध प्रचार यामुळे भाजपचा विजय सोप्पा झाल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली जंगी सभा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेले बळही निर्णायक ठरले. ही निवडणूक शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यातील संघर्षाचे प्रतिबिंब मानली जात होती. विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेला हा संघर्ष नगरपरिषद निवडणुकीत अधिक तीव्र झाला. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत केलेली रणनितीही भाजपच्या बाजूने गेली.
दरम्यान, प्रचारादरम्यान समाजमाध्यमांवरील आरोप-प्रत्यारोप, रावळगाव फॅक्टरीचा मुद्दा आणि घराणेशाहीची चर्चा भाजपच्या प्रचाराला पूरक ठरल्याचे मानले जाते. निवडणुकीदरम्यान उघडपणे पैसे वाटपाच्या घटना घडल्या.






