Monday, December 22, 2025

पर्यटकांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेवर नाताळ-नवीन वर्षासाठी विशेष गाड्या

पर्यटकांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेवर नाताळ-नवीन वर्षासाठी विशेष गाड्या

मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी खास भेट देत विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

नाताळ आणि सरत्या वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वे मार्गावर मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि कर्नाटकला जोडणाऱ्या विशेष गाड्या धावणार आहेत. या निर्णयामुळे पर्यटनप्रेमी प्रवाशांना थेट कोकण आणि गोव्याचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

या विशेष सेवांमध्ये डॉ. आंबेडकर नगर (मध्य प्रदेश) ते ठोकूर (कर्नाटक) आणि बिलासपूर (छत्तीसगड) ते मडगाव (गोवा) या मार्गांचा समावेश आहे. डॉ. आंबेडकर नगर ते ठोकूर दरम्यान धावणारी विशेष गाडी २८ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता ठोकूर येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात हीच गाडी २३ आणि ३० डिसेंबर रोजी ठोकूर येथून पहाटे ४:४५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३:३० वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे पोहोचेल. या गाडीला वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

याशिवाय बिलासपूर ते मडगाव दरम्यानही विशेष फेऱ्या चालवण्यात येणार असल्याने मध्य भारतातील प्रवाशांना थेट कोकण आणि गोव्याकडे जाण्याची मोठी सोय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे नियमित गाड्यांवरील प्रवासी ताण कमी होण्यासही मदत होणार आहे.

Comments
Add Comment