Monday, December 22, 2025

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. गोंदिया दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीच्या भविष्याबद्दल अत्यंत महत्त्वाचे विधान केले. "ऐकीव गोष्टींवर प्रतिक्रिया देणे हे आमचे तत्व नाही, मात्र राज्यात महायुती पूर्णपणे भक्कम आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, "या निवडणुका त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार लढवल्या जातात. स्थानिक समीकरणे वेगळी असू शकतात, मात्र याचा अर्थ महायुतीत फूट असा होत नाही." महायुतीमधील तिन्ही पक्ष (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) राज्यात पूर्ण समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस पुढे म्हणाले, "आमची महायुती कायम आहे आणि ती यापुढेही कायमच राहणार आहे. केवळ हे पाच वर्षच आमचे सरकार राहणार नाही, तर पाच वर्षांनंतर जेव्हा पुन्हा विधानसभा निवडणुका समोर येतील, तेव्हाही ही महायुतीच तुम्हाला मैदानात दिसेल." या विधानामुळे मुख्यमंत्र्यांनी केवळ सध्याच्या सत्तेचा दावा केला नाही, तर भविष्यातील प्रदीर्घ राजकीय नियोजनाचे संकेतही दिले आहेत. विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या 'नॅरेटिव्ह'ला उत्तर देताना त्यांनी महायुतीमधील एकजूट अधोरेखित केली.

Comments
Add Comment