Monday, December 22, 2025

विजयाने मातू नका, माजू नका!; मुख्यमंत्र्यांनी दिला नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना कानमंत्र

विजयाने मातू नका, माजू नका!; मुख्यमंत्र्यांनी दिला नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना कानमंत्र

मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला असून, विजयाचा जल्लोष साजरा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना महत्त्वाचा कानमंत्र दिला. "विजयाने मातणार नाही, माजणार नाही हा आपला संकल्प असला पाहिजे. निवडणुकीतील विजय हा आपल्या कामांची पोचपावती असतो," असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला.

राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीने एकूण २१४ नगराध्यक्ष पदे जिंकली आहेत. यापैकी एकट्या भारतीय जनता पक्षाने १२९ पदे पटकावली, तर शिवसेना ५१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ पदे मिळवली. दुसरीकडे, महाविकास आघाडीला फक्त ४४ पदांवर समाधान मानावे लागले. भाजपने नगरसेवकांमध्येही रेकॉर्ड ब्रेक केला असून, ३ हजार ३०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणले आहेत. राज्यातील एकूण नगरसेवकांच्या सुमारे ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपचे आहेत. गेल्या ३० वर्षांतील निवडणुकांचा विचार करता, एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच पक्षाचे नगरसेवक निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

निकालानंतर सोमवारी नागपूरमधील 'रामगिरी' निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य करत म्हटले, "महाराष्ट्रात भाजप हाच नंबर एकचा पक्ष आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. महायुतीने राज्यातील ७५ टक्के नगराध्यक्ष पदे जिंकली असून, विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले आहेत."

नागपूर जिल्ह्यातील कामगिरीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, "जिल्ह्यातील जवळपास सर्व नगरपरिषदांमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. सावनेर नगरपालिका पूर्णपणे काँग्रेसमुक्त केली आहे. काटोलचा अपवाद वगळता आम्ही विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले. हा विजय जनतेने सरकारच्या कामावर आणि विकासावर दाखवलेला विश्वास आहे." विजयाचा खरा मानकरी कार्यकर्ता

विजयाचे श्रेय देताना फडणवीस यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांचे कौतुक केले. "अनेकजण माझे अभिनंदन करत आहेत, पण या विजयाचा खरा मानकरी मी नव्हे, तर तुम्ही सर्व कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित प्रतिनिधी आहात. तुमच्या मेहनतीमुळेच भाजपला हा अभूतपूर्व जनादेश मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाला जनतेने दिलेला हा प्रतिसाद आहे", असे फडणवीस म्हणाले.

"विजयाने मातू नका, माजू नका. जिंकलेल्या शहरांमध्ये चांगले काम करू, न जिंकलेल्यांमध्येही परिवर्तन घडवू. ही चांगली सुरुवात महापालिका निवडणुकीतही प्रतिबिंबित होईल, याबाबत मला पूर्ण खात्री आहे", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >