आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप
मुंबई : नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपची बी-टीम म्हणून काम केले, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर त्यांचा रोष आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर रोहित पवार यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "जनतेने दोनदा मतांचे दान भरभरुन पदरात टाकले, त्यांच्या मी कायम ऋणात राहीन. पण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि उमेदवारांनीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली तरी आज लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे. जनतेवर आक्षेप नाही पण सगळीकडे पैसाच चालत असेल तर बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार आणि इतर अशा राजकीय दृष्टिकोनातून दुर्लक्षित आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना आम्ही सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.
आज तत्त्व आणि विकासावर चालणारे स्वच्छ राजकारण कमी आणि पैशांनी गढूळ झालेलेच अधिक दिसते. म्हणूनच आमच्या विरोधात निवडून आलेल्या काही लोकांचे कारनामे आणि धंदे बघितले, तर चारचौघात त्या धंद्यांचे नाव घेण्याचीही लाज वाटते. मग अशा परिस्थितीत डोक्यात विचारांचे काहूर उठल्याशिवाय राहत नाही, असे रोहित पवार म्हणाले.
काँग्रेसवर व्यक्त केला रोष
रोहित पवार म्हणाले, महत्त्वाचे म्हणजे काही अपक्षांनी, तसेच धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभे करून भाजपची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले.






