तीन ठिकाणी नगराध्यक्षाच्या पक्षालाच बहुमत
पालघर : पालघर जिल्ह्यात पार पडलेल्या तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. पालघर आणि डहाणू या दोन नगर परिषदेवर नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाने आपला झेंडा फडकविला आहे. जव्हार नगर परिषद आणि वाडा नगरपंचायत भाजपने काबीज केली आहे. पालघर नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम घरत, डहाणू नगराध्यक्षपदी शिवसेनेचे राजेंद्र माछी, तर वाडा नगरपंचायत अध्यक्ष म्हणून भाजपच्या रिमा गंधे आणि जव्हार नगराध्यक्षपदी भाजपच्या पूजा उदावंत निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे पालघर, जव्हार आणि वाडा या तीन ठिकाणी थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षाच्या पक्षालाच मतदारांनी पालिकेतसुद्धा स्पष्ट बहुमत दिले आहे. डहाणू येथे मात्र चित्र वेगळे आहे. या ठिकाणी मतदारांनी नगर परिषदेतील बहुमत भाजपच्या पारड्यात टाकले असून, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मात्र शिवसेनेचे निवडून दिले आहेत.
पालघर नगर परिषदेच्या ३० सदस्य पदासह नगराध्यक्ष पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या निकालात, शिवसेना शिंदे गटानेच बाजी मारली आहे. एकूण ३० जागांपैकी १९ जागी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. भाजपचे ८ आणि शिवसेना उबाठाचे ३ नगरसेवक येथे निवडून आले आहेत. डहाणू येथील २७ जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला केवळ २ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी गटाचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत, तर भाजपच्या १७ सदस्यांना डहाणू वासियांनी पालिकेच्या सभागृहात पाठविले आहे. जव्हार नगरपरिषदेच्या २० जागांपैकी १४ जागांवर भाजपने बाजी मारली आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी गटाचे ३ नगरसेवक निवडून आले असून, एका नगरसेवकाचा रूपाने राष्ट्रवादी गटाचे खाते सुद्धा उघडले आहे.
वाडा नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी ११ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. ३ जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या असून, शिवसेना उबाठा , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही राजकीय पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. दरम्यान, पालघर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उत्तम मोरेश्वर घरत यांना एकूण १६,५८० मते मिळाली असून, त्यांनी भाजपचे उमेदवार कैलाश म्हात्रे यांचा ५,१५३ मतांनी पराभव केला आहे. म्हात्रे यांना एकूण ११,४२७ मते मिळाली. शिवसेना उबाठाचे उमेदवार उत्तम पिंपळे हे ४,०९२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. काँग्रेसच्या प्रीतम राऊत यांना ३,५४७ मते मिळाली. जव्हार नगर परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार पूजा उदावंत यांना ३,८६५ मते मिळाली असून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रश्मीन मणियार यांचा १,६५३ मतांनी पराभव केला आहे. मणियार यांना एकूण २,२१२ मते मिळाली आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पद्मा राजपूत यांना १,४७९ मते मिळाली आहेत.
डहाणू येथे दोन उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माच्छी यांनी भाजप उमेदवार भरत राजपूत यांचा ४,०५५ मतांनी पराभव केला आहे. माच्छी यांना एकूण १४,८१५ मते मिळाली असून, राजपूत यांना १०,७६० मते मिळाली आहेत. वाडा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या रिमा हर्षद गंधे यांनी बाजी मारली असून, त्यांना ३,९६७ मते मिळाली आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार हेमांगी पाटील यांना २,९९५ तर शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार निकिता गंधे यांना २,४८७ मते मिळाली आहेत.
डहाणूत मात्र नगराध्यक्ष सेनेचा, बहुमत भाजपला
पालघर नगर परिषदेतील नवे नगरसेवक
१)प्रियंका म्हात्रे, २)आरिफ कलाडिया, ३)मीना मिश्रा, ४) भारती धोत्रे, ५) महेश कोटी, ६)कृपा मोरे, ७) आनंद राऊत, ८) प्रीती मोरे, ९) राजेंद्र पाटील, १०) पुष्पा जैन, ११) प्रगती म्हात्रे, १२) रईस खान, १३)ज्योती जाधव, १४) मुनाफ मेमन, १५) राधा मनकामे, १६) राहुल पाटील, १७) मेघा आघाव, १८)अमोल पाटील, १९) विभूती चंपानेलकर, २०) नीलम कुमार संख्ये, २१)सोनाली शिंदे, २२) भावनंद संख्ये, २३) अनिश पिंपळे, २४) उज्वला काळे, २५) चंद्रशेखर वडे, २६) शिल्पा वाजपेयी, २७) दिनेश घरत, २८) गीतांजली माने, २९) माधुरी सपाटे, ३०) जस्विन घरत.
डहाणू नगर परिषदेतील नवे नगरसेवक
१) अश्विनी पटेल २) रमेश काकड ३) प्रतीक्षा सुरती ४) विक्रम नायक ५) प्रदीप चाफेकर ६) अभिलाश जाहीवाला ७) दीप्ती शेलारे ८) जगदीश राजपूत ९) माधुरी धोडी १०) दिनेश माच्छी ११) आर्या गोहेल १२) मनीषा वावरे १३) शैलेश रखमुठा १४) आशा पाठक १५) वरुण पारेख १६) शुभांगी पाटील १७) युगाली पाटील १८) चंद्रकांत खुताडे १९ )रेखा माळी २०) कीर्ती मेहता २१) समीउउद्दीन पिरा २२) विशाल नांदस्कर २३) स्नेहा मार्डे २४) बिजली माच्छी २५) तन्मय बारी २६) भारती पाटील २७) दीपक जयस्वाल.






