कथा : प्रा. देवबा पाटील
आज शाळा सुटल्यांनतर घरी येताबरोबर सीता व नीता या दोघीही बहिणींनी “मावशी” म्हणून आनंदाने बाहेरूनच आपल्या मावशीला आवाज दिला.
मावशी समोर येताबरोबर दोघींनीही मावशीच्या गळ्यात आपले हात टाकले. ते बघून मावशी म्हणाली, “आज खूप खूश दिसतात माझ्या सोनुल्या. खूपच लाडात आल्यात.”
“होय मावशी. आज अाम्हाला सरांनी शाबासकी दिली.” सीता बोलली.
“कशी काय गं.” मावशीने विचारले.
“सरांनी विचारलेल्या साऱ्या प्रश्नांची आम्हीच उत्तरे दिलीत.” नीताने सांगितले.
“छान. माझ्याकडूनही तुम्हाला शाबासकी.” आपल्या दोन्ही हातांनी दोघींचीही पाठ थोपटीत मावशी म्हणाली.
“मावशी तुम्ही सांगितलेल्या माहितीमुळेच आम्ही सारी उत्तरे देऊ शकलो.” सीता म्हणाली.
“हो मावशी. खरेच. आज आम्हाला गृहपाठच नाही. तर चला ना आता गच्चीवर.” नीताने म्हटले.
“आधी तुम्ही गृहपाठाव्यतिरिक्तचा तुमचा अभ्यास करून घ्या.” मावशी बोलली.
“हो मावशी गृहपाठ नाही तरी आम्ही आमचा अभ्यास करून घेतो.” असे म्हणत दोघीही आपल्या अभ्यासाला लागल्या. अभ्यास झाल्यावर सतरंजी घेऊन पुन्हा मावशीजवळ आल्या व त्या तिघीही गच्चीवर गेल्यात व सतरंजी टाकून बसल्या.
“मावशी, आकाश दिवसा निळे तर मग रात्री काळे का दिसते?” सीताने आपली शंका काढली.
“रात्री अंधार असतो म्हणून.” नीताने पटकन उत्तर दिले.
“बरोबर आहे ते.” मावशी हसत हसत म्हणाली, “संध्याकाळी सूर्यास्तानंतर सूर्य मावळल्याने आपल्या भागावर पडणारा प्रकाश कमी कमी होत जातो व अंधार पडतो म्हणून आपणास रात्री आकाश काळे दिसते. पण तसे पाहिले तर आकाश हे वर सतत काळेच असते. आपणास दिवसा डोळ्यांनी जे दिसते ते आकाश असते व रात्री आपणास त्यांच्या प्रकाशात दिवसा दिसणाऱ्या आकाशापेक्षाही दूरवरचे जास्तीचे आकाश दिसते. त्याला अवकाश म्हणतात. अवकाश म्हणजे अफाट अशी विशाल पोकळी. अवकाशात धुळीचे कण नसल्याने सूर्यप्रकाशाचे विकिरणच होत नाही. त्यामुळे तेथे सूर्यकिरण असूनही प्रकाश दिसत नाही, तर सगळीकडे अंधार, काळोख दिसतो. म्हणून अवकाश केव्हाही सतत काळेशार दिसते.”
“परंतु मावशी आपणास तर रात्री त्यांच्या प्रकाशात आकाश छान दिसते.” सीताने म्हटले.
“आपण जो रात्री त्यांचा प्रकाश म्हणतो तो खरे तर आकाशातील त्या त्यांच्या भोवतीचा अतिशय तेज:पुंज प्रकाश असतो. त्यांच्या त्या प्रकाशानेच ते आपणास दिसतात. पण पृथ्वीवर पोहोचेपर्यंत तो खूप कमी होतो; परंतु आपणास रात्री आकाशात जो एक अंधुकसा प्रकाश चमकतांना दिसतो तो वेगळा असतो. आकाशात नायट्रोजन डायऑक्साईडचे अनंत कण असतात. ज्यावेळी नत्राच्या अणूचा प्राणवायूच्या अणूसोबत संयोग होतो त्यावेळी त्यातून अल्पसा प्रकाश बाहेर पडतो. नायट्रोजन डायऑक्साईडचे अनंत कण एकत्र आल्यामुळेच रात्री आकाशात एक विशिष्टसा अंधुक प्रकाश चमकताना दिसतो.” मावशीने स्पष्टीकरण दिले.
अशातच सीताला तहान लागली व ती स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेली व त्यांची त्यादिवशीची चर्चा अपूर्ण राहिली.