ढाका : बांगलादेश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत सापडला असून लक्ष्मीपूर सादर उपजिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जमावाने बीएनपी नेत्याच्या घरावर हल्ला करून आग लावल्याने सात वर्षांच्या चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास भाबनिगंज युनियन बीएनपीचे संघटन सचिव आणि व्यावसायिक बेलाल हुसेन यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. हल्लेखोरांनी घराच्या दोन्ही दारांना बाहेरून कडी लावून पेट्रोल ओतत घराला आग लावली. काही क्षणांतच संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी सापडले.
या आगीत बेलाल हुसेन यांची सात वर्षांची मुलगी आयेशा हुसेन हिचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर त्यांच्या दोन मुली सलमा आफ्तर आणि सामिया आफ्तर यांच्यासह बेलाल हुसेन हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेबाबत माहिती देताना बेलाल हुसेन यांच्या आई हाजेरा बेगम यांनी सांगितले की, जेवणानंतर कुटुंब झोपले होते. रात्री अचानक आग लागल्याचे लक्षात येताच बाहेर पळण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही दारे बाहेरून बंद होती. बेलाल हुसेन यांनी कसेबसे दार तोडून कुटुंबाला बाहेर काढले. त्यांची पत्नी चार महिन्यांच्या बाळासह आणि सहा वर्षांच्या मुलासह बाहेर पडली, मात्र तीन मुली खोलीत अडकून पडल्या. दोन मुलींना गंभीर अवस्थेत बाहेर काढले , मात्र आयेशाचा मृत्यू झाला.






