२०२६ मध्ये महाविकास आघाडीचे ७ आमदार निवृत्त होणार
मुंबई : विधान परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ सातत्याने घटत असल्याने विरोधी पक्ष नेतेपदाची वाट दिवसागणिक खडतर बनत चालली आहे. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर, आता नव्या वर्षात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह सात आमदार निवृत्त होणार आहेत. परिणामी वरिष्ठ सभागृहातदेखील सरकारला प्रभावी आव्हान देणे मविआसाठी कठीण होणार आहे.
पुढील मे आणि डिसेंबर महिन्यात अनेक आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने २०२६ हे वर्ष मविआसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. उबाठा पक्षप्रमुखांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि काँग्रेसच्या राजेश राठोड यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपुष्टात येईल, तर शरद पवार गटाचे अरुण लाड ६ डिसेंबर २०२६ रोजी निवृत्त होतील.
याशिवाय नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर आणि अपक्ष आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ मध्ये संपणार आहे. परिणामी, विरोधी पक्षातील सुमारे सात आमदार कमी होणार असून, मविआकडे केवळ ८ आमदार शिल्लक राहतील. त्यामुळे आपसूकच विरोधी पक्ष नेतेपदावरील सर्वांचाच दावा संपुष्टात येईल. दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीमधील काही सदस्यांचा कार्यकाळही पुढील वर्षी संपत आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपेल, तर सतीश चव्हाण ६ डिसेंबर २०२६ रोजी निवृत्त होतील.
मात्र, महायुतीचे विधानसभेतील प्रचंड बहुमत लक्षात घेता, त्यांना विधान परिषदेची निवडणूक सोपी जाणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.






