हवामानबदलामुळे विषारी सापांच्या नैसर्गिक अधिवासात बदल होत असून मानव-साप संघर्षाचा धोका वाढू शकतो. एका अभ्यासानुसार २०५० ते २०७० दरम्यान सापांच्या उपस्थितीची ठिकाणे बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम घाट आणि ईशान्य भारतात सापांच्या संख्येत घट होईल, तर मध्य भारतात विस्तार होईल. याचा परिणाम जैवविविधतेवरच होणार नाही, तर मानव-साप संघर्षाचा धोकाही वाढेल.
भारतातील हवामानबदलाचा परिणाम हवामान, उष्णता, पूर, दुष्काळ किंवा पिकांपुरता मर्यादित नाही. त्याचा जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांवरही खोलवर परिणाम होत आहे. एका नवीन वैज्ञानिक अभ्यासातून दिसून आले आहे, की हवामानातील जलद बदलांमुळे येत्या काही दशकांमध्ये भारतातील विषारी सापांचे नैसर्गिक अधिवास पूर्णपणे बदलू शकतात. याचा परिणाम केवळ जैवविविधतेवरच होणार नाही, तर मानव-साप संघर्षाचा धोकादेखील वाढू शकतो. या अभ्यासात संशोधकांनी भारतात आढळणाऱ्या ३० विषारी सापांच्या प्रजाती आणि त्यांच्या अधिवासांचे सखोल विश्लेषण केले. देशभरातील या प्रजातींचे इतके व्यापक आणि वैज्ञानिक मॉडेल विकसित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अभ्यासात, संशोधकांनी नागरिक विज्ञान प्लॅटफॉर्म, संशोधन पत्रे आणि ‘सोशल मीडिया’सह विविध स्त्रोतांकडून गोळा केलेल्या ४,९६६ नोंदींचे विश्लेषण केले. त्यानंतर त्यांनी वैज्ञानिक निकषांवर आधारित ही माहिती फिल्टर केली आणि अंतिम विश्लेषणात २,९३१ प्रमुख ठिकाणे समाविष्ट केली. या डेटाच्या आधारे प्रगत मॉडेल विकसित केले गेले. २०५० ते २०७० दरम्यान हवामानबदलामुळे प्रमुख सापांचे हॉटस्पॉट कसे बदलू शकतात, हे या अभ्यासातून पुढे आले. ज्या भागात या प्रजाती सर्वाधिक प्रमाणात आढळतात, त्या भागात भविष्यात ते कसे बदलू शकतात किंवा पूर्णपणे बदलू शकतात हे दर्शवले. या अभ्यासाचे निकाल खूपच चिंताजनक आहेत. २०७० पर्यंत भारताचा सुमारे तीन टक्के भूभाग व्यापणारे सापांचे हॉटस्पॉट पूर्णपणे बदलू शकतात असे ते सूचित करतात.
पश्चिम घाट आणि ईशान्य भारतासारख्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या प्रदेशांमध्ये या हॉटस्पॉटमध्ये लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे. पश्चिम घाटातील अनेक विषारी सापांच्या प्रजाती त्यांचे अधिवास गमावतील. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात सर्वात जास्त घट अपेक्षित आहे. याउलट, मध्य भारताच्या काही भागात आणि उत्तर पश्चिम घाटात, विशेषतः तीव्र हवामान परिस्थितीत नवीन हॉटस्पॉट उदयास येऊ शकतात. ईशान्य भारतातील, विशेषतः उत्तर बंगाल प्रदेशातील योग्य अधिवास सर्व हवामान परिस्थितीत हळूहळू कमी होऊ शकतात. सर्वात वाईट हवामान परिस्थितीत ही घट वेगवान होते. त्यामुळे सापांच्या प्रजातींच्या विविधतेत लक्षणीय घट दिसून येते. दुसरीकडे, मध्य भारतात सापांचे हॉटस्पॉट वाढू शकतात. याचा अर्थ असा, की ज्या राज्यांमध्ये आज साप तुलनेने दुर्मीळ आहेत, तेथे भविष्यात सापांचे प्रमाण वाढू शकते. भविष्यातील सर्वात गंभीर हवामान परिस्थितीत मध्य भारतातील अनेक भागांमध्ये, विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात सापांची विविधता वाढू शकते. या अभ्यासाचे निकाल आंतरराष्ट्रीय ‘जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्स’मध्ये प्रकाशित झाले आहेत. हा अभ्यास विशेषतः ‘बिग फोर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार सापांच्या प्रजातींवर लक्ष केंद्रित करतो. भारतात बहुतेक चावऱ्या सापांसाठी या प्रजाती जबाबदार आहेत. या प्रजातींमध्ये कॉमन क्रेट, इंडियन कोब्रा, रसेलचा साप आणि सो-स्केल्ड सापांचा समावेश आहे. भारतात वन्य प्राणी आणि सापांच्या हल्ल्यांमुळे होणारे मृत्यू आणि दुखापती वाढल्या आहेत.
‘आयस्टॉक’ अभ्यासात आढळून आले, की या प्रजातींचे अधिवास वाढत असताना सर्पदंशाच्या घटनादेखील वाढतात. ‘मॉडेलिंग’ने या चार प्रजातींच्या उपस्थिती आणि राज्यस्तरीय घटनांमध्ये एक मजबूत संबंध उघड केला. या चार प्रजाती मानवी वस्तीमध्ये सहज एकत्र राहतात, म्हणून त्यांची उपस्थिती थेट सार्वजनिक आरोग्याशी जोडलेली आहे. या अभ्यासात असेही अधोरेखित केले आहे, की येत्या काही वर्षांमध्ये मानव-साप संघर्ष वाढण्याची शक्यता असलेल्या भागात उत्तर भारताचे अनेक भाग, हिमालयीन प्रदेश, ईशान्य भारत आणि पश्चिम घाट यांसारख्या दक्षिण भारतातील उंच प्रदेशांचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, हे तेच प्रदेश आहेत, जिथे हवामानबदलाचा वेगाने परिणाम होत आहे आणि जिथे तापमान आणि पावसाच्या पद्धतींमध्ये बदल नवीन अधिवास निर्माण करत आहेत. भारतात केलेला हा पहिलाच व्यापक अभ्यास दाखवून देतो, की हवामानबदल केवळ पूर, दुष्काळ किंवा उष्णतेच्या लाटांपुरता मर्यादित नाही. तो आपल्या परिसंस्थेचे जटिल संतुलनदेखील बदलत आहे. त्यामुळे मानवी जीवनाला थेट धोका निर्माण होत आहे. साप हे थंड रक्ताचे प्राणी आहेत, जे वातावरणाद्वारे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करतात. म्हणून तापमान वाढल्याने, अनेक प्रजाती थंड प्रदेशात स्थलांतरित होतील. शिवाय, पाऊस आणि दुष्काळाचे स्वरूप बदलल्यास या प्रजाती नवीन भागात घुसू शकतात. शास्त्रज्ञांना भीती आहे, की या बदलत्या वातावरणात काही सापांच्या प्रजाती नाहीशा होतील, तर काही नवीन भागात पोहोचतील. त्यांची लोकसंख्या अनेक ठिकाणी वाढू शकते. याचा थेट परिणाम मानवावर होईल.
हवामानबदल हा केवळ भारतासाठी पर्यावरणीय संकट बनत नाही, तर सार्वजनिक आरोग्यासाठी एक नवीन आव्हान बनत आहे. अलीकडच्या एका अभ्यासात आढळून आले आहे, की हवामानबदलामुळे उत्तर आणि ईशान्य भारतातील पूर्वी विषारी सापांसाठी अयोग्य मानले जाणारे भाग आता त्यांच्या प्रसारासाठी योग्य होत आहेत. यामुळे या भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढू शकते. भारतीय उपखंडात मानवांना सर्वाधिक नुकसान करणाऱ्या चार विषारी सापांना ‘बिग फोर’ म्हणतात. यामध्ये कॉमन क्रेट, रसेलचा वाइपर, इचिस कॅरिनेटस आणि इंडियन कोब्रा यांचा समावेश आहे. या चार प्रजाती सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंना कारणीभूत आहेत. आसाममधील दिब्रू-सैखोवा संवर्धन सोसायटी, आसाम कृषी विद्यापीठ आणि दक्षिण कोरियाच्या पेक्योंग राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांनी हवामानबदलावर आधारित मॉडेल विकसित केले. या मॉडेल्समध्ये आढळून आले, की हरियाणा, राजस्थान आणि आसाम यांसारखी राज्ये ‘बिग फोर’ सापांच्या प्रसारासाठी वेगाने अनुकूल होत आहेत. वाढती उष्णता आणि आर्द्रतेला याची प्राथमिक कारणे म्हणून संबोधले जाते. अभ्यासात असेही दिसून आले आहे, की पूर्वी सापांसाठी अयोग्य मानल्या जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मणिपूर, मेघालय, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये येत्या काही वर्षांमध्ये सापांच्या संख्येत शंभर टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकते.
संशोधकांचे म्हणणे आहे, की ग्रामीण आणि शहरी भागात मानव-सापांच्या वाढत्या चकमकी आरोग्य सेवा प्रणालींसाठी नवीन आव्हाने निर्माण करतील. साप चावणे ही भारतात आधीच एक गंभीर समस्या आहे. तिला ‘उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग’ म्हणून वर्गीकृत केले आहे. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारताचा जगात सर्वाधिक क्रमांक लागतो. हवामानबदलामुळे डेंग्यू आणि मलेरिया नवीन भागात पसरत आहेत, त्याचप्रमाणे नवीन भागात सर्पदंशाच्या घटनादेखील वाढू शकतात. अभ्यासानुसार, दक्षिण भारतातील कर्नाटक (चिकबल्लापूर, हावेरी आणि चित्रदुर्ग) आणि गुजरात (देवभूमी द्वारका आणि जामनगर) या जिल्ह्यांमध्ये सर्पदंशाचा धोका जास्त असल्याचे आढळून आले. त्याच वेळी, भविष्यातील हवामान बदलामुळे, आसाम (नागाव, मोरीगाव, गोलाघाट), मणिपूर (टेंगनौपाल) आणि राजस्थान (प्रतापगड)सारख्या जिल्ह्यांमध्येही धोका वेगाने वाढू शकतो. हा अभ्यास हवामान नमुने, सापांचे भौगोलिक वितरण, सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि आरोग्यसेवा क्षमता यांचे विश्लेषण करणारा पहिला अभ्यास आहे. हवामानबदल केवळ पर्यावरणासाठी धोका नाही, तर मोठ्या आरोग्य आपत्तीचा इशारा आहे. संशोधकांनी सांगितले, की स्थानिक सरकारे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने हवामानबदलाला तोंड देण्यासाठी आणि असुरक्षित क्षेत्रांना बिग फोर सापांच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.
जगात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या भारतात सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर हा अभ्यास आणखी गंभीर बनतो. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या वंचित भागात हे संकट सर्वात गंभीर आहे. ‘आयस्टॉक’च्या अभ्यासानुसार, भारतात दर वर्षी सुमारे ५० हजार लोक सर्पदंशामुळे मरतात. तथापि, प्रत्यक्ष आकडा खूप जास्त असू शकतो, कारण बहुतेकदा प्रकरणे नोंदवली जात नाहीत. अशा परिस्थितीत संशोधकांनी इशारा दिला आहे, की येत्या दशकांमध्ये आपण दोन आघाड्यांवर तयारी केली पाहिजे. पहिला, जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी दूरदर्शी आणि हवामान-संवेदनशील योजना विकसित करणे आणि दुसरा, सर्पदंशामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य व्यवस्था चांगल्या प्रकारे तयार करणे. हे साध्य करण्यासाठी, बदलत्या हवामानानुसार जंगले आणि नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त असुरक्षित भागात जागरूकता मोहिमा सुरू केल्या पाहिजेत. अधिक आणि चांगल्या ‘अँटीव्हेनम’ची उपलब्धतादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात आरोग्य सेवा मजबूत करणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे.






