आजपासून मालिकेला सुरुवात
विश्वचषक संघ निवडीसाठी खेळाडूंची कसोटी
विशाखापट्टनम : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकाचे बिगुल आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. भारत आणि श्रीलंका महिला संघांमधील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होत असून, ही मालिका केवळ विजय-पराजयासाठी नसून भविष्यातील 'स्टार्स' शोधण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.या मालिकेतून भारतीय निवड समिती भविष्यातील संघ बांधणीवर भर देत आहे. मुंबई इंडियन्सकडून डब्ल्यूपीएलमध्ये जी. कमलिनी छाप पाडल्यानंतर, ही युवा यष्टिरक्षक-फलंदाज आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या वैष्णवी शर्मा हिच्याकडे भारताची भविष्यातील हुकमी एक्का म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ देखील शशिनी गिम्हानी आणि रश्मिका सेव्वांदी सारख्या खेळाडूंना संधी देऊन भारताला कडवे आव्हान देण्याच्या तयारीत आहे.
२०२६ विश्वचषकाची तालीम इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०२६
टी-२० विश्वचषकापूर्वी खेळाडूंचा फॉर्म आणि मानसिक क्षमता तपासण्यासाठी ही मालिका निर्णायक ठरेल. भारतीय संघ व्यवस्थापन या पाच सामन्यांतून विविध जोड्या आणि रणनीतींचा प्रयोग करणार आहे.
मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक :
- पहिला सामना: २१ डिसेंबर, विशाखापट्टनम (संध्या ७.००)
- दुसरा सामना: २३ डिसेंबर, विशाखापट्टनम (संध्या ७.००)
- तिसरा सामना: २६ डिसेंबर, तिरुवनंतपुरम (संध्या ७.००)
- चौथा सामना: २८ डिसेंबर, तिरुवनंतपुरम (संध्या ७.००)
- पाचवा सामना: ३० डिसेंबर, तिरुवनंतपुरम (संध्या ७.००)
असा आहे श्रीलंकेचा महिला संघ :
चामरी अथापथ्थू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा (उपकर्णधार), हसिनी परेरा, विशमी गुणरत्ने, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, इमेशा दुलानी, कौशिनी नुथ्यांगना (यष्टिरक्षक), मालशा शेहानी, इनोका रणवीरा, शशिनी गिम्हानी, निमेषा मधुशानी, काव्या कविंदी, रश्मिका सेव्वांदी, मलकी मदारा.
असा आहे भारतीय महिला संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार),शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष (यष्टिरक्षक),जी. कमलिनी (यष्टिरक्षक), एन. श्री चरणी, वैष्णवी शर्मा.