Sunday, December 21, 2025

धक्कादायक मनोरुग्णाने तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलले ; तरुणीची प्रकृती स्थिर

धक्कादायक मनोरुग्णाने तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलले ; तरुणीची प्रकृती स्थिर

पनवेल : पनवेल ते खांदेश्वर रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी सकाळी धावत्या लोकलमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. महिलांच्या डब्यात घुसलेल्या एका व्यक्तीने वादानंतर १८ वर्षीय कॉलेज तरुणीला धावत्या लोकलमधून खाली ढकलल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारात तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी खारघर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सकाळी आठच्या सुमारास ती सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलने महिलांच्या डब्यातून प्रवास करत होती. लोकल सुटत असतानाच शेख अख्तर नवाझ (वय ५०) हा इसम महिलांच्या डब्यात चढला. महिलांनी त्याला खाली उतरण्यास सांगितल्यावर त्याने वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद वाढल्यानंतर रागाच्या भरात आरोपीने मागून जोरदार धक्का देत तरुणीला धावत्या ट्रेनमधून खाली फेकले. या धक्क्यामुळे ती थेट रुळांवर पडली. या घटनेत तिच्या डोक्याला, कंबरेला आणि हातपायांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर जखमी अवस्थेत तिने आपल्या वडिलांना फोन करून माहिती दिली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

घटनेनंतर आरोपी खांदेश्वर स्थानकात उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच सतर्क प्रवाशांनी त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात घेतले. पनवेल रेल्वे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हा एकटाच आहे, त्याचे कोणीही नातेवाईक नाहीत. तो इकडे तिकडे फिरतो, प्राथमिक तपासात त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसून येत असून, त्यातूनच त्याने हे कृत्य केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा