प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
‘रिॲलिटी शो’ म्हणजे शुद्ध मराठीत वास्तविकतेचे दर्शन. म्हणजेच सत्य परिस्थिती जशीच्या तशी दाखवणे. ‘खतरों के खिलाडी’, ‘डान्स इंडिया डान्स’, ‘इंडियन आयडॉल’, ‘शार्क टँक इंडिया’, ‘बिग बॉस’, ‘सारेगमप’, ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’, ‘मास्टर शेफ इंडिया’ असे कितीतरी रिअॅलिटी शो आपल्याला आठवतील.
‘रिॲलिटी शो’ म्हणजे सामान्य लोकांना कला सादरीकरणाची संधी देणारे कार्यक्रम होय. यात संगीत, नृत्य, विनोद, अभिनय आणि साहसी स्पर्धांवर आधारित शोज असतात. वेगवेगळ्या वाहिन्यांवर नवनवीन कल्पना घेऊन अनेक नवीन शो येत असतात. जसे तरुणाईला स्टार बनण्याची संधी देतात, तसेच अनेक कार्यक्रम हे अतिशय छोट्या मुलांपासून ते वृद्धांसाठी आयोजित केले जातात आणि त्यांनाही भरपूर प्रसिद्धी आणि पैसा मिळवून देतात.
रिॲलिटी शोमधून अनेक भारतीयांना प्रसिद्धी मिळाली आहे, ज्यात नेहा कक्कर (इंडियन आयडॉल), आयुष्मान खुराना (रोडीज), अरिजित सिंग (फेम गुरुकुल), रणविजय सिंग (रोडीज), कपिल शर्मा (लाफ्टर चॅलेंज) आणि धर्मेश येलांडे (डान्स इंडिया डान्स) यांचा समावेश आहे. या नावांकडे आपल्याला पाहिल्यावर लक्षात येते की, रिॲलिटी शो फक्त अनेकांच्या कलागुणांना वाव देतात असे नाही, तर त्यातून भविष्यातील कोणत्याही क्षेत्रातील दिग्गजही घडवतात.
अनेकदा हे रिॲलिटी शो टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट किंवा टार्गेट रेटिंग पॉइंट लक्षात घेऊन निर्माण केले जातात. दूरदर्शनवरील कार्यक्रम किती लोक पाहतात आणि तो किती लोकप्रिय आहे हे मोजण्याचे एक साधन आहे. याच रिॲलिटी शोमध्ये भावनांना नाट्यमय पद्धतीने दर्शवले जाते, असे खूपदा आरोप होतात. कारण ते जितके वास्तववादी आहेत तितके कधीच नसतात. ते कसे घडून आणायचे याचे लेखन आधीच झालेले असते. कुठे हसायचे, कुठे टाळ्या वाजवायच्या, कुठे रडायचे वगैरेही आधीच ठरवलेले असते, असे म्हणतात. या रिअॅलिटी शोमध्ये जेव्हा त्या-त्या क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रित केले जाते तेव्हा तो शो संपूर्णतः त्यांच्या कार्यक्षेत्रावर आधारित असतो. उदाहरणार्थ जर पं. प्यारेलाल या संगीतकाराला गाण्याच्या/संगीताच्या रिअॅलिटी शोसाठी बोलवले गेले, तर संपूर्ण कार्यक्रमात स्पर्धक प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना गातात.
एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी यांना बोलावले गेले, तर त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी गायक कलाकार गातात. यामुळे हे रिॲलिटी शोज विशेष रंगतात. तर यात संपूर्णत: वास्तव नसते ते अशासाठी मला वाटते की, एका रिॲलिटी शोमध्ये एका फिल्मस्टारला बोलवले गेले होते, तर गाणाऱ्या एका मुलीच्या आईने आपल्या मुलीला नेसवलेल्या साडीवर त्या फिल्मस्टारचे पेंटिंग केलेले होते. तर एका रिॲलिटी शोमध्ये एक फिल्मस्टार वेगळ्या प्रकारे आपल्या डोळ्यांचा मेकअप करते, तर ‘तिचा मेकअप मला फार आवडतो’, असे शोमध्ये भाग घेतलेली मुलगी म्हणते आणि तेव्हा त्या फिल्मस्टारकडे डोळ्यांच्या मेकअपचा डबा आणून देऊन त्या फिल्मस्टारकडून त्या मुलीच्या डोळ्यांचा ती मेकअप करून घेतला जातो इ.
त्यामुळे कोण कलाकार दिग्गज येणार ते खूप आधी ठरवले जाते त्यानंतर त्या शोमधील कलाकारांनी काय बोलायचे याचबरोबर कलाकारांच्या पालकांनी काय करायचे वगैरे खूप गोष्टी आधीच ठरवल्या जातात आणि त्या अचानक घडत आहेत असे दाखवले जाते! रिॲलिटी शोचे स्टुडिओ प्रचंड झगमगाटी असतात. कलाकारांना गुण देताना वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून गुणांकन तांत्रिकदृष्ट्या ते खूप आकर्षक बनवले जाते. इथपर्यंत ठीक आहे; परंतु ‘मला मत द्या’, ‘मला निवडून येण्यास मदत करा’, ‘तुमच्या मदतीनेच मी सुपरस्टार होऊ शकतो.’ अशा विनवण्या जेव्हा हे गुणी कलाकार करतात तेव्हा अत्यंत वाईट वाटते.
टीआरपी वाढवण्यासाठी आणखीही काही काही केले जाते, याचे अनेकदा वाईट वाटते. कधी सहा महिने कधी एक वर्ष या रिॲलिटी शोमध्ये बराच वेळ घालवावा लागतो तेव्हा शाळा-महाविद्यालयाच्या पालकांनी रिॲलिटी शोमधील त्यांच्या पाल्याच्या सहभागाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, कारण अनेकदा यात वेगवेगळे दबाव असू शकतात! रिॲलिटी शोमध्ये कॅमेरा फिरवून तिथे आलेला दिग्गज कलाकार, परीक्षक, त्यांचे पालक, रसिक आणि शोमध्ये भाग घेतलेले गुणी कलाकार यांच्या हावभावाचे, हातवाऱ्यांचे, प्रतिक्रियांचे जे दर्शन आपल्याला घडवतात ते खूपदा अतिशयोक्तीचे वाटते. असो.
तर शेवटी काय प्रत्येकाला टॉप ऑफ दि वर्ल्ड (Top of the World) गाठायचे असते. रिॲलिटी शो हे कधी-कधी मोठे आणि महत्त्वाचे माध्यम ठरू शकते! बरीच माणसे अत्यंत आवडीने नियमितपणे रिॲलिटी शोज पाहतात. आजकालच्या टीव्ही मालिकांमधील कंटाळवाण्या कथानकापेक्षा त्यांना रिॲलिटी शोज जवळचे वाटतात. खरे वाटतात. निखळ आनंद देणारे वाटतात. तर मग मनोरंजन म्हणून ते रिॲलिटी शोजच्या जवळ जात असतील, तर चांगलीच गोष्ट आहे. फक्त त्याचा भाग आपण स्वतः किंवा आपल्या जवळच्यांना करायचे की नाही हे शेवटी आपणच ठरवायचे असते ना!
pratibha.saraph@ gmail.com






