संतोष राऊळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांचे वर्चस्व सिद्ध झाले. सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण आणि कणकवली अशा चारही ठिकाणी राणे यांच्या नेतृत्वाखालील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडून आल्या. यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी येथील भाजपची नगराध्यक्ष पदाची उमेदवार श्रद्धा राजे भोसले, वेंगुर्ले नगरपंचायतीवर भाजपचे दिलीप गिरप निवडून आलेत तर मालवण नगरपरिषदेवर आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ममता वराडकर निवडून आल्या आहेत. तसेच कणकवली येथे शिवसेना पुरस्कृत असलेल्या शहर विकास आघाडीत संदेश पारकर निवडून आले. कणकवली येथे आमदार निलेश राणे हे निरीक्षक होते आणि त्यांनी निवडणुकीचे निरीक्षक म्हणून दिलेल्या विजयाच्या टिप्स संदेश पारकर यांच्या विजयासाठी मोलाच्या ठरल्या. एकंदरीतच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या चारही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राणे कुटुंब यांचे नेतृत्व सिंधुदुर्गातील जनतेने स्वीकारले असेच म्हणता येईल. दरम्यान चारही शहरांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी लढाई पाहायला मिळाली आणि या लढाईत मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खूपच मागे फेकली गेली. खरं पाहता या लढाईत उबाठा कुठे स्पर्धेतच दिसली नाही. त्याचप्रमाणे ती मतांमध्ये सुद्धा फारसे अस्तित्व दाखवू शकली नाही. प्रत्येक नगरपंचायतीच्या ठिकाणी त्यांचा उमेदवार तिसऱ्या आणि चौथ्या नंबर वर फेकला गेला हे सुद्धा त्यांच्यासाठी चिंतनिय आहे.
सिंधुदुर्गातील प्रत्येक निवडणुक ही अटीतटीचीच असते. काही प्रमाणात सोपी वाटणारी निवडणूक टप्प्याटप्प्याने अवघड होत जाते आणि याचे उदाहरण सावंतवाडी, कणकवली, मालवण या ठिकाणी पहावयास मिळाले. जसे की सावंतवाडीत शिंदे सेनेला सुरुवातीला सोपी असलेली ही निवडणूक सावंतवाडीच्या राजघराण्याची सून असलेल्या श्रद्धाराजे भोसले यांच्या उमेदवारीने टप्प्याटप्प्याने जड होत गेली. माजी मंत्री आणि आमदार असलेल्या दीपक केसरकर यांचा उमेदवार अॅड.नीता सावंत कविटकर यांचा पराभव झाला. श्रद्धा राजे यांनी ५७८८ मते मिळवून विजय मिळवला. कविटकर यांना ४४२५ तर, उबाठाच्या सीमा मटकर यांना २१८४ आणि काँग्रेसच्या साक्षी वंजारे यांना ५७६ मते मिळाली. वेंगुर्ला मध्ये भाजपचे दिलीप गिरप हे २५४९ मते मिळवून विजयी झाले. शिंदे सेनेचे नागेश गावडे २११९ मते मिळवू शकले. तर काँग्रेसचे विलास गावडे १८५४ आणि उबाठा चे संदेश निकम यांना ८३९ एवढीच मते मिळाली. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे आणि या ठिकाणी पहिल्या दिवसापासून अपप्रवृत्तीच्या विरोधात आमदार निलेश राणे संघर्ष करत असल्याचे दिसून आले. या संघर्षातूनच त्यांनी फार मोठा विजय प्राप्त केला. शिवसेनेच्या उमेदवार ममता वराडकर यांना ४२०१ मते मिळालीत, भाजपच्या शिल्पा खोत यांना ३१५४ मते मिळालीत. तर उबाठाच्या पूजा करलकर यांना ३१७९ मते मिळाली.
कणकवलीत शेवटपर्यंत अटीतटीची निवडणूक झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर झाली दुसऱ्या फेरीत भाजपचे समीर नलावडे यांनी २५५ मतांची लीड घेतली. मात्र तिसऱ्या फेरीत आणि शेवटच्या दोन प्रभागांमध्ये संदेश पारकर यांनी लीड घेत १४५ मतांनी विजय मिळविला. समीर नलावडे यांना ५०९६ तर संदेश पारकर यांना ५२४१ मते मिळाली. एकंदरीतच चारही नगरपंचायतींमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे पालकमंत्री नितेश राणे तर शिवसेनेचे ( शिंदे सेना ) नेतृत्व करणारे आमदार निलेश राणे यांचेच उमेदवार निवडून आलेत. यातूनच सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे कुटुंबालाच येथील जनता कौल देते हे सिद्ध झाले.






