खेड : गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड नगरपरिषद निवडणुकीत २१-० असा ऐतिहासिक आणि एकतर्फी विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निकालात महायुतीने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
खेडमध्ये दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर कोणाची सत्ता येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, निकाल जाहीर होताच महायुतीने २१-० असा क्लीन स्वीप करत विरोधकांना नामोहरम केले. या निकालात महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही.
या घवघवीत विजयामुळे माधवी भुटाला या नगराध्यक्षापदावर विराजमान होणार आहेत. जनतेने दिलेल्या या स्पष्ट कौलातून विकासाभिमुख नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित झाला आहे.
या निवडणुकीत शिवसेनेचे १७ उमेदवार विजयी झाले तर भाजपचे ३ उमेदवार विजयी झाले.
खेडच्या राजकारणात २१-० हा निकाल मैलाचा दगड ठरणारा असून, महायुतीच्या एकसंध नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास दर्शवतो.






