मानवतावादी कलाकार...

कथा : रमेश तांबे


बालमित्रांनो, ही गोष्ट आहे युरोपमधल्या एका प्रसिद्ध गायकाची आणि त्याच्या वागण्याची! एका देशात कॅरेसू नावाचा एक मोठा गायक होता. त्याच्या कार्यक्रमांना खूप गर्दी होत असे. त्याची लोकप्रियता अफाट होती. त्यामुळे त्याचे कार्यक्रमदेखील खूप होत असत.


एका अंधशाळेला विकास करण्यासाठी पैसे गोळा करायचे होते. मग शाळा समितीने असं ठरवलं की आपण सुप्रसिद्ध गायक कॅरेसूचा कार्यक्रम आयोजित करूया, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी पैसे मिळतील. त्यातूनच आपण आपल्या शाळेचा विकास करू. मग शाळेचे एक शिष्टमंडळ सेक्रेटरीसह गायक कॅरेसू यांच्याकडे गेले. कॅरेसूंचा एक आलिशान बंगला होता. त्यातून गायक कॅरेसूची श्रीमंती झळकत होती. मग दिवाणखान्यात बसून शिष्टमंडळ कॅरेसूंची वाट पाहू लागले. थोड्याच वेळात सुप्रसिद्ध गायक कॅरेसू शिष्टमंडळासमोर हजर झाला. एकमेकांना नमस्कार झाले, चहापाणी झाले. त्यानंतर सेक्रेटरीने आम्ही अंधशाळेतून आलो आहोत. आम्हाला आमच्या शाळेचा विकास करण्यासाठी पैसे गोळा करायचे आहेत असे सांगून शाळेची संपूर्ण वस्तुस्थिती त्यांना सांगितली. त्याकरिता आम्ही आपला कार्यक्रम ठेवणार आहोत. त्यांचे बोलून झाल्यानंतर कॅरेसू म्हणाला की मी माझ्या कार्यक्रमाची फी म्हणून तीन हजार डॉलर्स घेईन. मग कार्यक्रमातून कितीही पैसे मिळवा, मी ते बघणार नाही. एवढी रक्कम ऐकल्यानंतर शाळेचे सेक्रेटरी आणि त्यांचे शिष्टमंडळ थोडे चमकलेच. कारण एवढे पैसे दिल्यानंतर त्यांच्या हातात काहीच रक्कम उरणार नव्हती. त्यांनी कॅरेसूंना विनंती केली की, आम्ही अंधशाळेसाठी हा कार्यक्रम ठरवत आहोत. आम्हाला शाळेची नवी इमारत बांधायची आहे. कृपया तुम्ही पैसे थोडे कमी करा! शाळा सेक्रेटरींची ही मागणी कॅरेसूने सरळ सरळ धुडकावून लावली. स्पष्ट शब्दांत त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, “माझ्या गाण्याची किंमत हीच आहे. मला माझे तीन हजार डॉलर्स द्या. त्यानंतर तुम्ही कितीही पैसे कमवा.” शेवटी हो ना करता करता शाळेचे सेक्रेटरी तयार झाले आणि गायक कॅरेसूचा गाण्यांचा कार्यक्रम हा तीन हजार डॉलरला ठरला.


कार्यक्रम खूप छान झाला. कार्यक्रमाला भरपूर गर्दी झाली. त्यातून शाळेला थोडेफार पैसेही मिळाले; परंतु तेवढे पैसे पुरेसे मुळीच नव्हते. पण कार्यक्रम संपल्यानंतर एक विशेष गोष्ट घडली. गायक कॅरेसू व्यासपीठावरून उठला आणि समोर बसलेल्या लोकांना उद्देशून म्हणाला की, “शाळेच्या विकासासाठी माझ्याकडून मी दहा हजार डॉलर्सची देणगी देत आहे.” शाळा सेक्रेटरी अवाक् झाले. ते स्वतः गायक कॅरेसू यांच्याकडे गेले आणि म्हणाले, “सर आपण आपल्या गाण्याची फी तीन हजार डॉलर्स सांगितली. अनेक वेळा विनंती करूनही आपण आपल्या मानधनातला एक डाॅलरही कमी केला नाहीत. आपल्या फीवर अगदी ठाम राहिलात आणि आता आम्ही कोणतीही मागणी केली नसताना आपण शाळेला चक्क दहा हजार डॉलर्सची देणगी दिली हे कसे काय !”


तेव्हा कॅरेसू म्हणाले, “गायक कॅरेसू आपली किंमत कमी करणार नाही” तसेच जो मानवतावादी कॅरेसू आहे तोही आपली किंमत कधीच कमी करणार नाही. म्हणूनच मी गायक म्हणून फीची एक हजार डॉलर्सची मागणी केली आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेल्या कॅरेसूने दहा हजार डॉलर्सची देणगी शाळेला दिली.


मित्रांनो, आपण आपल्या वागण्याची पातळी कधीही खाली जाऊ द्यायची नसते. हाच मोठा धडा आपल्याला या गोष्टीतून मिळतो.

Comments
Add Comment

सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर, सीनिअर (नाईट) कॉलेज (कामोठे)

कै. बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना जून २००५ मध्ये करण्यात आली. कामोठे वसाहतीतील व ग्रामीण

करकरीत वर्ष

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ नावीन्याचे आकर्षण नाही, असा माणूस जगात सापडणे शक्यच नाही, असे मला वाटते. माझी

सारथी

गोष्ट लहान, अर्थ महान : शिल्पा अष्टमकर माणूस शिकतो, पुढे जातो; पण खऱ्या अर्थाने घडतो तो संवेदनशीलतेमुळे.

विनूचे आजोबा

कथा : रमेश तांबे विनूचे आजोबा रोज मोठमोठे ग्रंथ वाचत बसलेले असायचे. विनू ते रोज पाहायचा. पण त्याला हे कळायचं नाही

सकाळी सूर्य मोठा व तांबडा का दिसतो?

कथा : रमेश तांबे सीता व नीता या दोघीही बहिणी खूपच जिज्ञासू होत्या. त्या दररोज त्यांच्या मावशीला प्रश्न विचारून

सरत्या वर्षाच्या उंबरठ्यावर...!

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक कथा कुठेतरी वाचल्याचे आठवत आहे, जी माझ्या पद्धतीने मी फुलवून सांगण्याचा