मनस्विनी : पूर्णिमा शिंदे
कृतीविन वाचाळता व्यर्थ आहे. कृती केलीच नाही, तर परिवर्तन होईल का? समाज जीवनामध्ये रोज नव्याने बदलताना बदलांना सामोरे जावे लागते. स्पर्धांना तोंड द्यावे लागते. अनेक आव्हाने पेलावी लागतात. आपापल्या पूर्तीप्रमाणे कष्ट, प्रयत्न, मेहनत, प्रयत्नांची कास धरावीच लागते. कधी-कधी शारीरिक मानसिक कष्ट हे आपापल्या कुवतीच्या बाहेर जाऊन पेलावे लागतात तेव्हाच कुठे जीवनाचे नंदनवन खुलते. माणूस जिवंतपणी जीवनाचा स्वर्गदेखील करू शकतो आणि तेव्हाच कुठे तो कृतकृत्य होतो. ही कृतार्थता कर्तव्यदक्षतेमुळेच साध्य होते. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर आपापल्या कर्तव्याचे कलश भरावे लागतात. हेच कर्तव्याचे माप असते जे रिते ठेवून जीवनाचे सार्थक कसे होईल? थोरा-मोठ्यांच्या गोष्टींतून आपण अनेक आदर्श घेतो. श्रीराम, कृष्ण, देवी-देवता असतील किंवा छत्रपती शिवराय, संत ज्ञानेश्वर असतील आपल्याला हेच तर बोध देतात की, माणसाच्या कर्तृत्वाला सार्थक कसं करता येईल? कर्तव्यरूपी वरदान हे केवळ माणसाला लाभलेले आहे. ती जिद्द, ती वाणी, ती बुद्धी, प्रखर तेजस्विता त्याच्याकडेच आहे. इतर प्राण्यांकडून त्याची अपेक्षा केली जाईल का? कोणत्याही कर्तव्यासाठी जीवाचं रान करावं लागतं अशी मंडळी आपल्या भारतात जगात होऊन गेलेली आहेत. त्यांची उदाहरणे पाहूया. रयतेच्या सुखासाठी भाजीच्या देठालाही धक्का न लावणाऱ्या प्रजाहित दक्ष छत्रपतींकडून आपण ही शिकवण घेऊ शकतो, तसेच संत ज्ञानेश्वर यांच्या अमृत ग्रंथ ज्ञानेश्वरीसारख्या सर्व समाज कल्याणासाठी रचलेल्या ग्रंथातून हे स्पष्ट होते. आपापल्या परीने होईल तितके कष्ट घेऊन आपण हे शक्य करू शकतो. अशक्य ही गोष्ट शक्य होते. प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे किंवा आधी केले मगच सांगितले करत राहा, करत राहा. निरपेक्ष वृत्तीने फळाची अपेक्षा न करता केवळ आपले कार्य करत राहा.
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशु कदाचनम. आपण आपल्या अवतीभोवती पाहतो बरीचशी मंडळी मौजमजा मस्ती ऐशोआरामात राहून स्वप्नाळू जगात वावरत असतात. त्यांना श्रमप्रतिष्ठा मूल्य ठाऊकच नसते पण जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. स्वामी समर्थांनी मनाच्या श्लोकमध्ये अतिशय सुंदर सांगितले आहे. कर्तव्यदक्षता म्हणजे आपल्या कार्याविषयी सजग सतर्क राहणे. सृजनशील, सर्जनशील आणि संवेदनशील ही जिवंतपणाची तीन वैशिष्ट्य आहे. तल्लीनता, तत्परता आणि तेजस्विता हे तारुण्याचे तीन प्रकार आहेत. सुंदर हृदयास सौदार्हात म्हणतात. आपली कार्यपद्धती ही नित्य सुंदर, नीटनेटकी, वेळेचे व्यवस्थापन आणि समाजमन सुखावणारी असावी. प्रबोधनात्मक असावी, लोकहितवादी असावी नव्या नव्या स्पर्धा सुद्धा नावीन्यमय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन साधून सुसंस्कार व संस्कृती यांचा मिलाप करणारी असावी. हीच आहे कर्तव्यदक्षता... प्रभावी तितकीच दमदार आणि परिणामकारक. नेतृत्व शैलीत कर्तव्यदक्षता हा फार मोठा अत्यंत माैलाचा गुण आहे. कर्तव्यदक्ष माणूस नेहमी यशस्वी होतो. अनंत आमची ध्येया सक्ती अनंत आशा.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो या प्रार्थनेमध्ये भारतात शोभून दिसणारे हिरे जर पाहिले तर श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवराय, संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू तुकोबाराय, संत गाडगेबाबा, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गोखले, आगरकर, गांधी, नेहरू, टिळक यासारखे अनेक पूज्यनीय-वंदनीय दृष्टे देशाला लाभले. इतरांच्या जीवनाचे सोने केले. कर्तव्यदक्ष प्रभूतींनी जीवनाचे सार्थक केले ते त्यांच्या कर्तव्यदक्षतेनेच. भारताच्या गानकोकिळा ज्यांनी जगात मानाचा तुरा खोवला. त्या स्व. लता दीदी, सिंधुताई सकपाळ, सुधा मूर्ती जगण्यासाठी अशा प्रेरणा ध्येय देणाऱ्या या सर्व थोर महात्म्यांना वंदन करावेसे वाटते आणि त्यांची कर्तव्यदक्षता आपल्या अंगी बाणवावी अशा सर्वांना मी शुभेच्छा देते. नेतृत्वगुणांमध्ये समाज सेवेसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांना देखील या गुणाचा अतिशय लाभ होईल. नेतृत्वात कर्तव्यदक्षता ही प्रेरणादायी, आनंददायी, सेवाभावी, सेवा तत्पर असणं कर्तव्यनिष्ठ असणं अत्यंत अनमोल सद्गुण आहे. जीवनात प्रत्येक क्षणाला त्याची उपयुक्तता आहे.