Saturday, December 20, 2025

मैत्रीण नको आईच होऊया !

मैत्रीण नको आईच होऊया !

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू

मागील लेखात मैत्रीण नको आईच होऊया याबद्दल आपण काही ऊहापोह केला होता, मात्र मैत्रीण व्हायचे नाही तर आईच्याच भूमिकेत राहायचे अशावेळी मुलीशी कशा पद्धतीने वागावे याबद्दल या उर्वरित भागात आपण समजून घेणार आहोत.

टीनेजमधील मुलीशी वागताना नियम आणि प्रेम या दोघांची कसरत तुम्हाला करावी लागली आणि कधीकधी तर मुलीला तुमच्या वागण्याच्या बंधनांचा, नियमांचा खूप रागही आला असेल असे असले तरी ते तुमचं तुमच्या मुलीवरचे प्रेम होतं, हे काही वर्षांनी तिला समजेल. कळेल की आपली आई नाही म्हणाली पण त्यापेक्षा खूप जास्त गोष्टींना ती हो म्हणाली आहे. का असं नाही म्हणाली ती, कारण त्या वेळेला ते तुमच्या मुलीच्या कल्याणासाठी होतं.

या वयात वागण्याची पद्धत आणि शिस्त यांचा तोल सांभाळणं तिच्यासाठी कठीण जातं. समजून वागणं आणि तुमची शिस्त पाळणे हे दोन्ही एकाच वेळी कसं करावं हे तिला कळत नाही. तुम्हाला दोघींनाही असं वाटत असतं की तुमच्यामध्ये छान नातं तयार व्हावं पण तुम्ही मोठ्या असल्याने पालकत्वाच्या सिंहासनावर बसलेले असता. मग पॉवर स्ट्रगल सुरू होतो. एटीट्यूड दाखवला जातो. मुलीच्या अनादाराच्या वागण्याने तुम्ही थकून जाता. तर दुसरीकडे मुलीचं मानसिक आरोग्य डळमळीत झालेलं असतं. काही मुली निराशा, चिंता, खाण्याच्या डिसऑर्डर यांच्यासारख्या गोष्टींशी झुंज देत असतात अशा परिस्थितीत टीनेजर मुलींशी वागावं तरी कसं ?

१) मुलींशी वागताना, बोलताना, खोचकपणा, निंदा टाळा. व्यंगात्मक बोलण्यापासून दूर राहा. त्यांच्याशी बोलताना हे लक्षात घ्या तुमच्या बोलण्यात टोमणे नकोच. त्यांच्या वागण्यावर लक्ष केंद्रित करून त्यांना नावे ठेवण्यापेक्षा जे अपेक्षित आहे तो मेसेज नक्कीच मुलींपर्यंत पोहोचवा. मुलगी जर आक्रमक वागत असेल तर हे जरूर सांगा की तू नीट शांत वागलीस की मग बोलूया. कारण तुमची मुलगी सध्या तिच्या स्वतःच्या जगात इतकी बुडून गेली आहे की, तिला स्वतःपलीकडेही काही जग आहे याची जाणीवच नसल्याने ती सतत मी मी असं म्हणत असते. आई-वडिलांच्या आयुष्यातले चढ-उतार तिच्या लक्षातच येत नाहीत.

२) मुलींच्या मैत्रिणीबद्दल आणि त्यांच्या दिसण्याबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल अति टीका करू नका. मुली आपल्या पसंतीचे कपडे, ज्वेलरी जशी निवडतात तशा त्यांच्या मैत्रिणीही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात.

जसे त्यांना छंद, कला, खेळ, पुस्तकं त्यांच्या आवडीची हवी असतात तसेच त्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीच्या मैत्रिणीबाबतही ट्राय करून बघतात, म्हणून लगेच काही ठरवून मोकळे होऊ नका. मुलीवर टीका केली तर ती मुलींच्या मनाला दुखावते आणि मैत्रिणींना बोललं की तो अपमानच वाटतो. तुमची मुलगी अजाण आणि अर्ध्या वयात आहे म्हणून आपण शहाण्यासारखं वागायचं. टीनेजर मुलगी बनून भांडत बसायचं नाही. कारण मुलींसाठी तुम्हीच रोल मॉडेल असता. मुलगी पाहत असते की आई संघर्ष, भांडणं, वादविवाद, परिस्थिती, ताण कसा हॅण्डल करते. त्याचेच अनुकरण ती तिच्या पुढच्या आयुष्यात करणार आहे.

३) कधी कधी मुलीला अपयशाचा सामनाही करू देत. मला ठाऊक आहे हे आपल्या मुलीबाबत कोणालाच आवडणार नाही पण या चुकांतूनच मुलगी शिकते. परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकते.

स्वतःवर परफेक्ट होण्याचे प्रेशर या वयात मुली टाकत असतात. इतरांना खूश करण्याचा प्रयत्न करतात. पण मुलींना सारखं जपण्याच्या नादात त्यांना अडचणींना सामोरे जाण्याची संधी आपण टाळत असतो, ते लक्षात घ्या. खरं म्हणजे अडचणींना सामोरे गेल्याने मुलींचा आत्मविश्वास वाढतो. त्या आव्हान स्वीकारायला तयार होतात. माया आणि आपुलकीने जरूर बघा पण सारखी मदत करून त्यांना मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या अपंग करू नका.

४) मीडिया वापरण्याबाबत त्यांना मीमांसात्मक दृष्टिकोन द्या. तुमच्या मुली मीडियावर पाहत असलेले फोटो हे फिल्टर केलेले किंवा फोटोशॉप केलेले असतात. ते पाहताना मुली स्वतःची तुलना त्या फोटोशी करतात आणि एका मोहजालात अडकत जातात. त्यांची स्वप्रतिष्ठा, मानसिक आरोग्य, स्वप्रतिमा खालावत जाते. म्हणूनच स्त्रिया आणि मुली यांचा मीडियावर कसा उपयोग केला जातो याची मुलींशी चर्चा करा. वास्तव आणि आभासी जगातला फरक समजावून सांगा. इन्स्पिरेशनल ट्रेड टॉकस कार्यक्रम ऐकू द्या.

५) मुलींच्या रूम्समध्ये एक नाहीतर अनेक भावनिक वादळे घोंगावत असतात. नात्यातलं गोंधळलेपण असतं. आपण मुलींच्या प्रत्येक वागण्या-बोलण्याच्या कृतीवर वाद घालत बसलो, तर सारेच कठीण होऊन बसतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. कोणत्या विषयावर चर्चा होतील आणि कोणत्या विषयावर वाद होतील याचा विचार करणे आणि त्याप्रमाणे त्यांना महत्त्व द्यायला हवं.

६) मुलींसाठी आपण उपलब्ध राहूया. मुली शाळेतून घरी आल्यावर दार उघडायला, स्मित हास्याने स्वागत करायला, जवळ घ्यायला, दिवसभरातलं शेअर करायला जर तुम्ही असलात तर ते तुमच्या दोघींसाठीही खूप चांगलं असतं. आपण मुलींबरोबर घालवलेले छोटे छोटे क्षणही खूप मोलाचे असतात.

गप्पा करताना, काम करताना आपण जे बोलत असतो, वागत असतो त्यातूनच नातं फुलत जातं, संवाद उमलत जातो, बहरत जातो. मुलींना तुमची मतं यातूनच कळत जातात.

७) मुलींच्या प्रायव्हसीचा आदर करा. मुली जसजशा मोठ्या होतात. विशेषतः टीनेजमधील मुली बऱ्याच गोष्टी सांगत नाहीत. फिल्टर करून सांगतात. आपलं मन धास्तावलेलं असतं. सतत भीती वाटते, बाहेरच्या या जगात आपलं पिल्लू कसं शाबूत राहील?

मुली मात्र त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन त्यांच्या स्वतःपुरतं मर्यादित ठेवतात. म्हणून सारखं कुरतडत राहिलात, विचारत राहिलात तर त्याच्यातून चिडचिड आणि भांडणं होतील.

पण याऐवजी असं म्हणू शकता की मला जाणवते की तुझ्या आयुष्यात सध्या काहीतरी घडतंय, तुझ्या प्रायव्हसीचा मी आदर करते. मात्र तुला माझ्या मदतीची गरज असली तर मी नेहमीच आहे. अति ताण टाकला नाही की मुली सांगायला हरकत नाही असा विचार करतात. अर्थातच अति धोका वाटल्यास हस्तक्षेप करायलाच हवा हे नक्की. आणि म्हणूनच जरी मुलगी आपल्या बरोबरीची होत असली तरी सध्या तिची मैत्रीण होण्यापेक्षा आई होणेच जास्त संयुक्तिक नाही का?

Comments
Add Comment