मुंबई : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भाजप सर्वाधिक जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत हा विजय महायुतीचा असल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांनीही चांगली कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले.
या निवडणुका रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला मोठे यश मिळाल्याचे फडणवीस म्हणाले. या विजयाचे श्रेय रवींद्र चव्हाण यांच्यासह संपूर्ण टीम भाजपला असल्याचे त्यांनी नमूद केले.
फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्षांपैकी सुमारे ७५ टक्के नगराध्यक्ष भाजपचे आहेत. आतापर्यंतच्या निकालांनुसार भाजपचे १२९ नगराध्यक्ष निवडून आले असून नगरसेवकांच्या बाबतीतही भाजपने रेकॉर्ड केला आहे. यावेळी ३३२५ नगरसेवक भाजपचे निवडून आले असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा असल्याचा दावा त्यांनी केला.
या यशामागे सर्व मंत्र्यांची मेहनत, कार्यकर्त्यांचा संवाद आणि विकासावर आधारित प्रचार कारणीभूत ठरल्याचे फडणवीस म्हणाले. गेल्या २० ते २५ वर्षांच्या इतिहासात भाजपला मिळालेला हा सर्वात मोठा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत कोणत्याही विरोधी पक्षावर टीका न करता विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली गेली आणि जनतेने त्याला साथ दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
हा विजय टीम भाजपचा असल्याचे सांगत फडणवीस यांनी सातारा, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह सर्व विभागातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केल्याचे कौतुक केले. शहरांमधील जनतेने भाजपवर विश्वास दाखवला असून तो विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कोकणातील निकालांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, काही ठिकाणी महायुतीत तर काही ठिकाणी स्वतंत्र लढत झाली असल्याने निकालांमध्ये फरक दिसतो आहे. मात्र काही ठिकाणी भाजपला यशही मिळाले आहे.
विरोधकांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत प्रतिष्ठा बाजूला ठेवणे योग्य नाही. भाजपने कधीही कार्यकर्त्यांना एकटे सोडले नाही. निवडणूक जिंकणं-हरणं होत असतं, पण कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणं महत्त्वाचं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
चंद्रपूर संदर्भात बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, जिथे कमी पडलो तिथे आत्मपरीक्षण करून आगामी महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरू. सुधीर मुनगंटीवार यांना कुठे ताकद कमी पडली असेल तर ती आगामी निवडणुकीत भरून काढू, असे आश्वासनही त्यांनी दिले.






