Saturday, December 20, 2025

निवडून येणाऱ्या जागांवरच भाजपाच्या इच्छुकांच्या उड्या

निवडून येणाऱ्या जागांवरच भाजपाच्या इच्छुकांच्या उड्या

जिंकून येणाऱ्या जागांवर परस्पर होते घुसखोरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न भाजपा पाहत असले तरी आवश्यक नसतानाही दुसऱ्याच्या प्रभागात उडी मारण्याचा प्रयत्नात भाजपाचे निवडून येणारे उमेदवारही आता पडले जाण्याची दाट शक्यता निर्माण व्हायला लागली आहे. विद्यमान प्रभागातील माजी नगरसेवकासाठी अनुरुप आरक्षण पडल्यानंतरही दुसऱ्याच विधानसभेतील इच्छुक उमेदवार तिथे पक्षाच्या आदेशाशिवाय प्रचार करून आपली खुंटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक ज्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, त्याची मानसिक स्थिती कमजोर होवून तो प्रभागात लक्ष देण्याऐवजी उमेदवारी पुन्हा मिळवण्यासाठी आपल्या पक्षातील लोकांशी सामना करत आहे.परिणामी भाजपाचे विद्यमान ८२ नगरसेवक असले तरी अशाप्रकारच्या पक्षातील गैरवर्तनामुळे निवडून येणारे नगरसेवकही पडणे किंवा पाडले जाणे असे प्रकार घडून ही संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाने ज्या उमेदवाराचे नगरसेवक पदाचा कालावधीतील कामाचे स्वरुप, पुढील साडेतीन वर्षांमधील जनतेशी असलेला संपर्क, आरक्षण अनुरुप असेल तर त्या माजी नगरसेवकाला सर्व विचार करून उमेदवारी देण्यात येईल अशाप्रकारच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जे विद्यमान नगरसेवक आहेत आणि त्यांचे आरक्षण कायम राहिले किंवा लढण्यासारखे आरक्षण असेल तर संबंधित माजी नगरसेवकाला पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु असे असतानाच शीव कोळीवाडा विधानसभेत प्रभाग क्रमांक १७२मध्ये विधानसभेच्या बाहेरच्यांची इच्छुक म्हणून चर्चा होवू लागली आहे. या प्रभागातून दोन वेळा निवडून आलेल्या राजेश्री शिरवडकर आहेत. हा प्रभाग आता महिला राखीव झाला आहे. परंतु या प्रभागातून माहिममधील भाजपाच्या अक्षता तेंडुलकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे आजवर धारावीमध्ये कार्यरत असणारे मणिबालन हे आपल्या पत्नीला प्रभाग १७२मधून उतरवू इच्छितात.

विशेष म्हणजे या प्रभागातील उमेदवार बदलला जाईल किंवा नाही याबाबत पक्षाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना नसताना धारावी आणि माहिमधील उमेदवारांनी या प्रभागात धाव घेतल्याने नक्की पक्षात चाललेय काय असा प्रश्न भाजपाच्या कार्यकर्त्यांना पडू लागला आहे. राजेश्री शिरवडकर यांनी माहिम विधानसभेतील प्रभाग क्रमांक १९१मधून तर शीव कोळीवाडा येथील प्रभाग क्रमांक १७६मधून लढवावी अशाप्रकारची विनंती केली जात आहे. परंतु पक्षाचा आदेश नसताना तसेच काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा प्रभाग सलग दोन वेळा निवडून आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर तसेच आरक्षण कायम असताना तिथून दुसऱ्या प्रभागात पाठवण्याची गरज काय असा प्रश्नही कार्यकर्त्यांना पडू लागला आहे. विशेष म्हणजे महायुतीमध्ये प्रभाग क्रमांक १९१हा शिवसेनेला जाणार आहे. त्यामुळे तसेच नवख्या प्रभागात पाठवून निवडून येणारी जागा हातची का घालवली जात आहे असाच प्रश्न भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे पक्षातील या बेशिस्त वर्तनामुळे तळातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली पहायला मिळत आहे.

ही परिस्थिती केवळ शीव कोळीवाडा विधानसभेतील या प्रभागात नसून जोगेश्वरी, मालाड, मुलुंड आदी विधानसभेतही ऐकायला येत आहे.

Comments
Add Comment