सोलापूर : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असली तरी ही निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राचे लक्ष वेधले. महत्त्वाचे म्हणजे मागील ६० वर्षांपासून ह्या गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा राहिली असल्यामुळे यावेळी काय होणार याकडे सर्वांच्या नजरा असताना राजन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या संदर्भातील पत्र राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकऱ्यांना दिले आहे.
अनगर हे माजी आमदार राजन पाटील यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला होता. तसेच अनगर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदासाठी १७ जागांवर १७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबत औपचारिक घोषणा होणे बाकी होती. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकऱ्यांना लिहिलेल्या पत्रामुळे मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतची बिनविरोध घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पाटलांनी गुलाल उधळला आहे.
२००४ च्या आदेशानुसार उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांवर तसे करण्यास कोणताही दबाव आणलेला नाही. तसेच उमेदवार बिनविरोध निवडून येताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची अनियमतता घडलेली नाही, जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्या विरूद्ध कोणतीही लेखी तक्रार अथवा न्यायालयीन प्रकरण दाखल झालेले नाही, याची खातरजमा जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर करण्यात आलेली आहे, असे अहवाल प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या संदर्भ क्रमांक ४ च्या प्राप्त अहवालामध्ये नमूद अनगर नगरपंचायतीच्या जागांसाठी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोग या पत्राद्वारे मान्यता देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्व १७ सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने बिनविरोध जाहीर करण्यास आयोगाने मान्यता दिली आहे. याबाबत आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक हे अधिकृत घोषणा करणार आहेत. तसेच सर्व विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी हे विजयाचे प्रमाणपत्र सुपूर्द करणार आहे. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतमध्ये सर्व १७ प्रभाग आणि नगराध्यक्ष पदावर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्राजक्ता पाटील या उमेदवार होत्या.






